शरद पवारांकडे राज्य चालवण्याचे "कॉन्ट्रॅक्‍ट' ः चंद्रकांत पाटील 

अजित झळके
Thursday, 29 October 2020

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन काही प्रश्‍न मांडले. त्याबाबत तुम्ही शरद पवार यांना भेटा, असा सल्ला कोश्‍यारी यांनी दिला. वास्तविक, त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटा, असे सांगायला नको होते का, या प्रश्‍नावर श्री. पाटील यांनी टोलेबाजी केली.

सांगली ः मुख्यमंत्री घर सोडून बाहेर पडत नाहीत. ऑनलाईन कॉन्फरन्स घेऊन चर्चा करत नाहीत. ते काय राज्य चालवणार आणि प्रश्‍न सोडवणार. हे राज्य चालवण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट शरद पवारांकडेच दिलेले आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या विकास कामांचे उद्‌घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील आज सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन काही प्रश्‍न मांडले. त्याबाबत तुम्ही शरद पवार यांना भेटा, असा सल्ला कोश्‍यारी यांनी दिला. वास्तविक, त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटा, असे सांगायला नको होते का, या प्रश्‍नावर श्री. पाटील यांनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांना काही सांगून उपयोग आहे का? ते कुठे राज्य चालवतात. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शरद पवार यांच्याकडे प्रश्‍न घेऊन गेले तरच काहीतरी फायदा आहे, कारण त्यांच्याकडेच राज्य चालवण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट आहे.'' 
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्‌विट करून शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्याबाबत विचारले असता श्री. पाटील म्हणाले, ""ही आपली संस्कृती आहे. पक्ष कुठलाही असो, काम करणाऱ्या माणसाचे कौतुक केले पाहिजे. शरद पवार या वयात राज्यभर फिरताहेत, ही कौतुकाची बाब आहेच, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घर सोडायला तयार नसताना पवारांनी फिरावे, याचे कौतुक केले तर चुकीचे काय आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's "contract" to run the state: Chandrakant Patil