रानावनातल्या काट्याकुट्यातून थेट खाकी वर्दीच्या अंगणात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

संजयचे आई, वडील बळ्ळारी येथे कायमचेच मेंढपाळ व्यवसायासाठी वास्तव्यास आहेत.

खडकलाट (बेळगाव) : जिद्द, कष्ट व अभ्यासाच्या जोरावर येथील संजय आप्पासाहेब गावडे या मेंढपाळाच्या मुलाने कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलात उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. 

संजयचे आई, वडील बळ्ळारी येथे कायमचेच मेंढपाळ व्यवसायासाठी वास्तव्यास आहेत. घरात कोणीही शिकलेले नाही. शेतीही थोडीच आहे. सुट्टीत आई-वडिलांना मेंढपाळ व्यवसायात मदत करत पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात 14 वा रॅंक पटकावला. या यशाचे श्रेय त्याने शिक्षण देऊन मोठे होण्याची प्रेरणा देणाऱ्या अडाणी आजोबांना दिले. 

हेही वाचा - अलीकडे या घटनांमध्ये होतीये वाढ, नागरिकांत घबराहट 

दहावीत 81 टक्के गुण घेतलेल्या संजयने मुधोळ येथे 2013 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा 90 टक्के गुणांसह पूर्ण केला. म्हैसूर येथे 2016 मध्ये एन. आय. कॉलेजमधून बी. ई. पदवी 87 टक्के गुणांसह घेतली. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी संजय याने कठोर परिश्रम घेऊन धारवाडमध्ये वर्षभर अभ्यास केला. जून 2020 मध्ये घेतलेल्या परीक्षेत 14 व्या रॅंकसह अधिकारीपद पटकावले. त्याची कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या म्हैसूर 5 बटालियनमध्ये नियुक्ती झाली आहे. 13 जानेवारीस पदावर रुजू होईल. 

"ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. दबाव न घेता अभ्यास केल्याने यश मिळाले. त्यासाठी आजोबा व आई वडिलांची प्रेरणा मिळाली. यूपीएससी उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला आहे."

- संजय गावडे, खडकलाट 

हेही वाचा - काही वेळातच पुन्हा कुत्र्यांचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी कानोसा घेतला अन्...

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shepherd son pass a PSI exam with the help of our parents in nipani