शिराळा नगरपंचायत वार्तापत्र : सत्तेत प्रत्येक घटकाला स्थान देण्याचा प्रयत्न

शिवाजीराव चौगुले
Sunday, 14 February 2021

शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी चार वर्षात सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे व सध्या सुनीता निकम या तीन महिलांना संधी देऊन आमदार मानसिंगराव नाईक यांनी समाजातील प्रत्येक घटकाला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिराळा (जि. सांगली) : शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी चार वर्षात सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे व सध्या सुनीता निकम या तीन महिलांना संधी देऊन आमदार मानसिंगराव नाईक यांनी समाजातील प्रत्येक घटकाला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध सभापती पदासाठी ही वेगवेगळ्या चेहऱ्याना संधी देऊन पुढील निवडणुकीचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिल्यांदा स्थापन झालेल्या नगरपंचायतवर आपला झेंडा फडकण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार मानसिंगराव नाईक, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी आमदार शिवाजीराव नाईक व कॉंग्रेसच्या माध्यमातून सत्यजित देशमुख यांच्या तिरंगी लढत दिली होती. या लढतीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी 11 उमेदवारांच्या माध्यमातून बाजी मारली होती.

शिवाजीराव नाईक यांनी सहा उमेदवारांच्या माध्यमातून नगरपंचायत मध्ये विरोधी पक्ष म्हणून प्रवेश केला. सत्यजित देशमुख यांना एक ही उमेदवार निवडून न आल्याने सत्तेपासून दूर रहावे लागले होते. त्या पूर्वी बाजारसमिती, पंचायत समिती, जिल्हापरिषद अशा महत्वाच्या निवडणुकीत मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख आघाडी करून शिवाजीराव नाईक यांना आमदार असताना सत्तेपासून दूर ठेवले होते. पण ऐन नगरपंचायत निवडणुकीत त्यांच्या आघाडीत बिघाडी होऊन तिरंगी लढत झाली. आत्ताचे चित्र बदलले आहे.

सत्यजित देशमुख यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढील नगरपंचायत निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार. त्यामुळे शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांच्या विरोधात मानसिंगराव नाईक यांना टक्कर द्यावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी नाईक-देशमुख यांना टक्कर देत बाजी मारली. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्याची तयारी आमदार नाईक यांनी सुरू केली आहे. तर सत्तांतर घडवण्याची तयारी नाईक-देशमुख यांनी केली आहे.

या निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून आमदार नाईक यांनी चार वर्षात तीन महिलांना नगराध्यक्षा होण्याची संधी दिली आहे. पहिल्यांदा सुनंदा सोनटक्के नंतर अर्चना शेटे व सध्या सुनीता निकम यांनी संधी दिली. त्याच बरोबर उपनगराध्यक्ष पदाची किर्तीकुमार पाटील व सध्या विजय दळवी यांनी संधी दिली. 

प्रत्येकाला कामाची संधी 
विविध सभापती पदाची संधी प्रत्येकाला देऊन राजकीय समतोल कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रभागातुन नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक नगरसेवक यांना विविध पदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी देऊन प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याची किमया केली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirala Nagar Panchayat Newsletter: Attempt to give chance to every element in power