शिराळा नगरपंचायत वार्तापत्र : हरित शहर बनवण्यासाठी धडपड

शिवाजीराव चौगुले
Monday, 25 January 2021

शिराळा नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानअंतर्गत स्वच्छता, नो व्हेइकल डे, मियावाकी जंगल प्रकल्प असे अनेक उपक्रम हाती घेतले असून, याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.

शिराळा (जि. सांगली) : शिराळा नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानअंतर्गत स्वच्छता, नो व्हेइकल डे, मियावाकी जंगल प्रकल्प असे अनेक उपक्रम हाती घेतले असून, याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांनी शिराळा शहर हरितशहर बनवण्यासाठी आपली कंबर कसली आहे.

या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असली तरी विरोधक म्हणून भाजपचे नगरसेवक आपली जबादारी पार पाडत आहेत. काही वेळा वेगवेगळ्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक खडाजंगी होत असली तरी नगरपंचायतचा लौकिक वाढविण्यासाठी मात्र एकत्रित काम करत आहेत, हे विविध उपक्रमांच्या सहभागातून दिसून येत आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विकास मंत्रालयातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून शिराळा शहर हरितशहर बनविण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवार हा नो व्हेइकल डे पाळला जात आहे. 
याची सुरवात नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केली. दुसऱ्या आठवड्यात तहसीलदार गणेश शिंदे यांनी सायकवरून प्रवास करून आपला सहभाग नोंदवला. 

त्यानंतर हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. पर्यावरणसंदर्भात काम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून नगरपंचायतने दोन मियावाकी जंगलनिर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. नितीन जाधव आणि डॉ. दीपक यादव यांनी हा प्रकल्प त्यांच्या खासगी जागेत उभारला आहे. शिराळा नगरपंचायत ही मियावाकी जंगलनिर्मिती प्रकल्प "माझी वसुंधरा अभियान'मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे. नगरपंचायतमार्फत मियावाकी जंगलच्या संगोपनासाठी लागणाऱ्या आवश्‍यक गोष्टीचा पुरवठा होत आहे.

आठवड्यातून एक वेळ स्मशानभूमीत, मंदिर परिसर, शालेय परिसर, विविध प्रभाग व इतर ठिकाणची स्वच्छता केली जाते. लोक सहभाग वाढवा म्हणून चित्रकला, रांगोळी, लघुचित्रपट, जिंगल, स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले. जनजागृती व लोकसहभाग वाढवण्यासाठी मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना सर्व नगरसेवकांची मोलाची साथ मिळत आहे. त्यामुळे सर्वांनीच शिराळा शहर हरितशहर बनवण्यासाठी आपली कंबर कसली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirala Nagar Panchayat Newsletter: Struggle to make a green city