शिरखुर्मा : रमजान ईदचा खास मेन्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

रमजान ईद सणाची गोडी वाढते ती शिरखुर्म्यामुळे. ईदला अजून काहीच दिवस बाकी असले तरी घरोघरी शिरखुर्म्याची तयारी सुरू झाली आहे.

रमजान ईद सणाची गोडी वाढते ती शिरखुर्म्यामुळे. ईदला अजून काहीच दिवस बाकी असले तरी घरोघरी शिरखुर्म्याची तयारी सुरू झाली आहे. शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदीही केल्या जातात. 

रमजानईदचा खास मेन्यू म्हणजे शिरखुर्मा. ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम कुटुंबाच्या घरी बनणारा हा पदार्थ. कुटुंब किती मोठे, ईदच्या दिवशी किती पाहुणे घरी येणार आहेत आणि किती जणांच्या घरी शिरखुर्मा पाठवायचा आहे, यावरून शिरखुम्यार्साठी किती सामान आणायचे, हे ठरवले जाते. काही घरांमध्ये तर ते लिटर दुधाचा शिरखुर्मा बनविला जातो. बदाम, काजू, खोबरे, किसमिस, पिस्ता, अक्रोड, शेवया, खजूर, अंजीर, जर्दाळू, चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो. अनेक घरांत आता या गोष्टींची खरेदी झाली असून, खोबरे किसून ठेवणे, बदाम सोडून इतर सुकामेव्याचे तुकडे करून ठेवणे, खजुरातून बिया काढून ठेवणे हे काम सुरू आहे. ईदच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर शिरखुर्मा बनवावा लागत असल्यामुळे या गोष्टींची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते. 

ईदच्या आदल्या दिवशी रात्री बदाम पाण्यात भिजवत टाकतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची साल काढून बारीक तुकडे केले जातात. हे तुकडे मग शिरखुर्म्यात टाकले जातात. काहीजण हे पदार्थ आधीच तळून ठेवतात. त्यामुळे ऐनवेळी गडबड होत नाही. 

ईदला शिरखुर्माच का? 
ईदला शिरखुर्माच का बनविला जातो, याविषयी सांगताना मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की, मूळ शिरखुर्मा म्हणजे दूध आणि खजूर यांचेच मिश्रण होय. पूर्वी खजूर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे तेथील सगळ्यांना सहज घेणे शक्‍य व्हायचे. दूध म्हणजे शिर आणि खुर्मा म्हणजे खजूर या दोन्हींच्या मिश्रणातून शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि बदलत जाणाऱ्या खाद्यसंस्कृतीमुळे यात अनेक बदल झाले. शेवया व इतर सुकामेवाही शिरखुर्मामध्ये येत गेला. 

ईदच्या खरेदीवर दुष्काळाचा परिणाम 
ईदच्या खरेदीसाठी बाजारात नेहमी गर्दी होते. कपडे, चप्पल, बुट, दागिने, घर सजावटीच्या वस्तू, सौंदर्य साधने खरेदीसाठी गर्दी होते. ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन व्यावसायिक नियोजन करतात. महिलांसह नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirkhurma: Special menu for Ramajan eid