खोक्‍यांत विरतोय यंत्रांचा आवाज... 

अभिजित कुलकर्णी
सोमवार, 20 जानेवारी 2020

शिरोली औद्योगिक वसाहतीला खोक्‍यांचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. महामंडळाने वसाहतीमध्ये चहा व नाष्टा सेंटरसाठी सुमारे तीस अधिकृत भूखंड दिले आहेत. शिवाय जय महाराष्ट्र चहा व पान व्यावसायिक संघटनेने न्यायालयातून आणखी बावीस खोकी अधिकृत केली आहेत. असे असताना सुमारे दोनशे खोकीधारकांनी वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून खोकी उभारली आहेत.  महामंडळाने तात्काळ ही खोकी हटवावीत अशी मागणी उद्योजकांतून होत आहे. 

नागाव  (कोल्हापूर) : शिरोली औद्योगिक वसाहतीला खोक्‍यांचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. महामंडळाने वसाहतीमध्ये चहा व नाष्टा सेंटरसाठी सुमारे तीस अधिकृत भूखंड दिले आहेत. शिवाय जय महाराष्ट्र चहा व पान व्यावसायिक संघटनेने न्यायालयातून आणखी बावीस खोकी अधिकृत केली आहेत. असे असताना सुमारे दोनशे खोकीधारकांनी वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून खोकी उभारली आहेत.  महामंडळाने तात्काळ ही खोकी हटवावीत अशी मागणी उद्योजकांतून होत आहे. 

सध्या औद्योगिक वसाहतीमध्ये जल व गॅस वाहिनीचे काम सुरू आहे. हे काम रस्त्याच्या दुतर्फा सुरू असल्याने दोन्ही खोकी निघतील अशी उद्योजकांची अपेक्षा होती; मात्र दोन्ही कामे खोक्‍यांना थोडाही धक्का न देता सुरू आहेत याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
औद्योगिक वसाहतीमधील पहिला फाटा येथे जलवाहिनीच्या कामासाठी क्रेनच्या साह्याने तात्पुरती बाजूला घेऊन पुन्हा मूळ जागेवर ठेवण्यात आली. एचएमटी फाटा येथे खोक्‍यांसमोरील छपऱ्या काढून खोक्‍यांना थोडाही धक्का न लावता जलवाहिनीसाठी खुदाई करण्यात आली. चहा व नाष्टा सेंटर वगळता अन्य व्यावसायिक खोकी औद्योगिक वसाहतीत नकोत, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. पण रात्री मद्यपींना चकना पुरविण्यासाठी चिकन 65 व चायनीज सेंटरवर ओपन बारच सुरू असतात. काही खोकिधारकांनी वसाहतीच्या मुख्य ठिकाणी खोकी घालून ती भाड्याने दिली आहेत; मात्र वसाहतीमधिल या वाढत्या अतिक्रमणाला रोखण्याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. 

एमआयडीसी पोलिस ठाणे, स्मॅक आयटीआय व वसाहतीमधिल दळण वळणाचा मुख्य रस्ता म्हणून एचएमटी फाटा वर्दळीचे मुख्य केंद्र आहे. या एकाच ठिकाणी सुमारे तीस खोकी असल्यामुळे येथे नेहमी वाहतूक कोंडी असते. महामंडळाने अधिकृत खोकी वगळता अन्य खोकी तात्काळ हटवून मुख्य चौकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी आहे. 

 

निवेदन देणार

"स्मॅक'ने औद्योगिक विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे; पण पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे करत खोकीधारकांना अभय देण्याचे काम महामंडळ करत आहे. महामंडळाला पोलिस बंदोबस्तच हवा असेल तर उद्योजकांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहे. 
अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiroli industrial area encroachment