शिवसेनेचा वाघच पडलाय व्हॅलेंटाईनच्या प्रेमात... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

जिकडे-तिकडे चोहीकडे प्रेमाचीच चर्चा आहे. कॉलेजातील मुलं-मुली प्रेमात डुंबल्याचे दिसते आहे. मात्र, त्यांच्यासोबत करारी बाण्याचा शिवेसनेचा "वाघ'ही प्रेमात पडलायं. वाघ आणि प्रेम हे समीकरण विरोधाभासी वाटत असलं तरी तसंच घडलंय.

नगर ः व्हॅलेंटाईन डे एका दिवसांवर येऊन ठेपलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत कोणत्याही कॉलेजात जाऊन कानोसा घेतला तर व्हॅलेंटाईन डेचीच चर्चा कानावर पडेल. मोबाईलवर ई गिफ्ट पाठवायची सुविधा असली तरी गिफ्ट शॉपी खचाखच भरल्या आहेत. मेट्रोसीटीच नाही तर गावखेड्यातील तरूणाईही व्हॅलेंटाईन डेच्या माहोलामुळे मोहरून गेली आहे.

वाघाला झालीय प्रेमाची बाधा

जिकडे-तिकडे चोहीकडे प्रेमाचीच चर्चा आहे. कॉलेजातील मुलं-मुली प्रेमात डुंबल्याचे दिसते आहे. मात्र, त्यांच्यासोबत करारी बाण्याचा शिवेसनेचा "वाघ'ही प्रेमात पडलायं. वाघ आणि प्रेम हे समीकरण विरोधाभासी वाटत असलं तरी तसंच घडलंय.

झडप नाही जादू की झप्पी

तो दुसऱ्यावर शत्रूंवर झडप घालायची टाकून झप्पी देतो. आता वाघच प्रेमात पडलाय म्हणल्यावर प्रेमीयुगुलांना भीती ती कसली. तेही बिनदिक्कत वाघाच्या समोरून रासक्रीडा करायला घाबरत नाहीत. 

डरकाळ्यांमुळे व्हायची घबराट
व्हॅलेंटाईन डे हे म्हणजे नखरे आहेत. असली थेरं आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. दिसेल तिथे युगुलांना ठोकून काढू, अशा मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध व्हायच्या. अर्थातच शिवेसेनेच्या गोटातून अशा डरकाळ्या व्हॅलेंटाईन डेपूर्वी निघायच्या. माध्यमांमध्येही त्याचीच चर्चा असायची. प्रेमीयुगुलांना तर प्यार के दुष्मन वाटायचे. कॉलेजातही शिवसैनिक त्या दिवशी चक्कर मारायचे. गार्डनमध्ये, कट्ट्यावर दिसेल तेथे ठोकून काढायचे. किंवा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू द्यायचे नाही.

१९९५च्या काळात... 

सन 1995च्या काळात शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा तर हा विरोध आणखीच वाढला. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे कोणी व्हॅलेंटाईन डे साजरा करायला धजावत नसायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा "वाघ' मवाळ झालाय. व्हॅलेंटाईन डे आला काय आणि गेला काय शिवसेनेच्या गोटातून काहीच प्रतिक्रिया नसते. जुने जाणते यावर शिवसेनेचा वाघ व्हॅलेंटाईनच्या प्रेमात पडल्याची प्रतिक्रिया देतात.

आदित्य आणि धोरण 

युवा सेनेची धुरा आदित्य ठाकरे यांनी घेतल्यापासून हा फरक झाल्याचे सांगितले जाते. आदित्य हे मंत्री झाल्यापासून त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. नाईट लाईफची संकल्पना मांडली आहे. त्यावर विरोधकांनी टीकाही केली. परंतु ते या निर्णयावर ठाम आहेत. कालौघात शिवसेनेचा करारी वाघ व्हॅलेंटाईनच्या प्रेमात पडल्याची प्रतिक्रिया प्रेमीयुगुलांकडून व्यक्त होत आहे. प्रेमाची ताकदच तेवढी आहे, असा सूरही काहीजण लावतात. बदलत्या काळात शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डे विरोध काहे की नाही हे कळायला मार्ग नाही. परंतु ते हल्ली काहीच भूमिका घेत नाहीत. एकंदरीत शिवसेनेच्या या प्रेमळ भूमिकेचे युवा वर्गातून स्वागत होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Tigers fall in love with Valentine