आष्टा पालिकेसमोर शिवसेनेचे 'बुरखा फाडो'

तानाजी टकले 
Tuesday, 19 January 2021

आष्टा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करावी चार वर्षात 33 टन जंतुनाशक पावडर व अन्यत्र झालेल्या अशा वीस लाख रुपये खर्चाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने आष्टा नगरपालिकेसमोर "बुरखा फाडो'आंदोलन करण्यात आले

आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करावी चार वर्षात 33 टन जंतुनाशक पावडर व अन्यत्र झालेल्या अशा वीस लाख रुपये खर्चाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने आष्टा नगरपालिकेसमोर "बुरखा फाडो'आंदोलन करण्यात आले पालिकेचे विरोधी गटनेते वीर कुदळे शहरप्रमुख राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना चौकशीचे निवेदन देण्यात आले. योग्य ती चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही मुख्याधिकारी चव्हाण यांनी दिली. 

वीर कुदळे म्हणाले, ""नोव्हेंबर 2016 ते ऑक्‍टोबर 2020 पर्यंत पालिकेने 30 टन जंतुनाशक पावडर खरेदी केली 16 लाख 56 हजार रुपये खर्च केले. धूर फवारणी, चार फॉगिंग मशीन, एक हजार लिटर क्षमतेचे ब्लोअर मशीन स्प्रे पंपासाठी तीन लाख 31 हजार रुपये खर्च केले. चार वर्षात सुमारे वीस लाख रुपये खर्च करूनसुद्धा शहरातील स्वच्छता मोहीम व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. 

प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकारी यांचे व्हाट्‌स ऍप फेसबुक वरती गटारी साफ केल्याचे फोटो टाकण्यापलीकडे त्यांचे कर्तुत्व शून्य असून सामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे स्वच्छतेचा ठेका कोट्यावधींचा आहे शासनाच्या पैशावर ठेका रूपे दरोडा टाकला जात आहे. उपनगरातून घंटागाडी जात नाही कर्मचारी ठेकेदारांचे समन्वय नसून संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे जंतुनाशक पावडर शहराच्या कोणत्या भागात टाकली याचा मुख्याधिकाऱ्यांनी शोध घ्यावा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.'' 

नंदकिशोर आटुगडे म्हणाले, ""30 टन जंतुनाशक पावडर ठेवता येईल एवढे मोठे पालिकेकडे गोडाऊन आहे का? की सदर पावडर पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये ठेवली जाते खरंच याचा खरा नाम्या खोटा नाम्या प्रशासनाने जनतेपुढे सादर करावा.'' नगरसेविका वर्षा अवघडे माजी नगरसेवक अमोल पडळकर दिलीप कुरणे, सतीश कुलकर्णी, गजानन दाटिया, स्वप्नील माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's 'burqa torn' in front of Ashta Municipality