थ्री डी कोलाजमधून साकारले शिवचरित्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा पहिलाच प्रयत्न असून त्याचे प्रदर्शन २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान जिव्हाजी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे, अशी माहिती सौ. अंजली बावणे व स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष दत्ता शिंगारे यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 

इचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा पहिलाच प्रयत्न असून त्याचे प्रदर्शन २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान जिव्हाजी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे, अशी माहिती सौ. अंजली बावणे व स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष दत्ता शिंगारे यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास, फॅशन आणि कला यांबाबत सौ. बडे यांना आकर्षण होते. घरच्या आग्रहाखातर त्यांनी वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना मिळालेल्या वेळेत त्यांनी पेन्सिल चित्र काढण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना दादासाहेब सुतार यांचे मार्गदर्शन मिळाले. शिक्षण घेताना त्यांनी रेखाटलेल्या चित्राचे चंद्रकांत मांडरेकर यांनी कौतुक केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या कलेकडेही अधिक लक्ष केंद्रित केले. पती डॉ. दशावतार बडे यांना फोटोग्राफीची आवड होती. या दांपत्याच्या कलाकृतीचे ‘कलास्पंदन’ प्रदर्शन २०११ मध्ये इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहमध्ये ठेवले होते. 

पती डॉ. बडे, सासरे यांच्या मिळालेल्या प्रोत्साहनामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील १६ थ्री डी कोलाज साकारले आहेत. यासाठी तब्बल ७ वर्षे त्यांनी परिश्रम  घेतले. त्यांच्या निवासस्थानी यासाठी स्वतंत्र दालनच उभे केले आहे. या कलाकृतींचे प्रदर्शन पुणे येथे झाले आहे. 

स्वकुळ साळी समाजाच्या सहकार्याने २४ ते २८ ऑगस्टदरम्यान सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शहराला गौरवास्पद अशा कलाकृती पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेस डॉ. ज्योती बडे, डॉ. डी. जी. बडे, दिनानाथ भांबीष्टे, बाळकृष्ण खामकर, विजय कोळेकर उपस्थित होते.

बाबासाहेब पुरंदरेंकडून कौतुक
कला क्षेत्रात वेगळे काहीतरी करायचे याचा त्यांनी ध्यास घेतला आणि थ्री डी कोलाजमध्ये शिवराज्याभिषेक साकारण्याचा निर्णय घेतला. यासाठी अनेक रंगसंगती, कपडे लागणार होते. यासाठी त्यांना प्रमोद आणि प्रवीण बावणे यांची मदत मिळाली. राज्याभिषेकासाठी उपस्थित ७० पगडी लोकांना दाखविण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणाहून कपडे गोळा केले. तब्बल २ वर्षाच्या प्रयत्नातून शिवराज्याभिषेकाचा ४ फूट बाय ८ फूट आकाराची कलाकृती साकारली. शिवचारित्राचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांनी घरी येऊन कलाकृती पाहून कौतुक केले. आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील २५ प्रसंग थ्री डी कोलाजमध्ये साकारावे, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivcharitra in Three D Kolaj