...अन्यथा मी पुन्हा येईन : शिवेंद्रसिंहराजे

प्रशांत गुजर
बुधवार, 18 डिसेंबर 2019

आजच्या टोल बंद आंदोलनांच्या पार्श्वभुमिवर सकाळी आठपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फ़ौज फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच शीघ्र पोलिस कृती दलाच्या दोन तूकडयाही तैनात होत्या.

सायगाव (जि. सातारा) : मुदत देऊनही पंधरा दिवसांत सातारा - पुणे रस्त्याची डागडूजी न केल्याने आज (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यासह आनेवाडी टाेल नाका बंद पाडला. परिणामी वाहनधारकांना मोफत प्रवासाची संधी मिळाली.

अवश्य वाचा -  रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडे ६६ कोटींची थकबाकी

टोल बंद करा, रिलांयस इन्फ्रा मुर्दाबाद अश्या घोषणा देत शिवेंद्रसिंहराजे व शेकडो कार्यकर्ते आनेवाडी टाेल नाका येथे आले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात बंदाेबस्त हाेता. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले सातारा ते पुणे प्रवास करताना सर्वसामान्य जनतेला खड्यातून प्रवास करावा लागत आहे,पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही बुजविले गेले नाहीत, रस्त्याची दुरावस्था झाली असून टोल वसूली केली जात आहे. आज ज्या पद्धतीने सोई सुविधा जसे पिण्याचे पाणी, महिला व पुरुष यांच्यासाठी शौचालय, रुग्णवाहिका , टोइंग वाहन तसेच अन्य सुविधा वेळेत मिळत नाहीत. येथील शौचालये कुलुप बंद करून ठेवली जातात.

महामार्ग प्राधिकरण , रिलायन्स इन्फ्रा यांच्या झालेल्या करारामधे आनेवाडी टोल नाका पासून 25 किलोमीटर अंतरामधील स्थानिक जनतेला सवलती दिल्या पाहिजेत त्या मिळत नाही मग टोल कशासाठी द्यायचा. सेवा रस्ते खचले आहेत. मुख्य महामार्गवर मोठ मोठे खड्डे पडले असून, रिलायन्स कंपनी मात्र महामार्गवार फक्त 33 खड्डे असल्याचे सांगत आहे.  मात्र परिस्थिति याच्या उलट असून दर 100 मीटरला 33 खड्डे आहेत.

हेही वाचा - खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव

खेड शिवापुर येथील टोल नाका बंद करण्याचा प्रस्ताव जसा पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी तयार केला आहे,तसा प्रस्ताव सातारा जिल्हाधिकारी यांनी करून सातारकर जनतेची होत असलेली लूट थांबवावी. रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देवून महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले त्यावेळी त्यांनी देखील रिलायन्स इन्फ्राला महामार्गाच्या दुरुस्ती व देखभालीच्या सूचना केल्या मात्र त्यांच्या आदेशाला देखील या कंपनीने केराची टोपली दाखवली.

दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी साताराच्या बाजूला असणाऱ्या सर्व बूथ वरील बैरिकेट्स स्वतः बाजूला करीत वाहनधारकांसाठी लेन खुली करून दिली. सातारा बाजुच्या लेन खुल्या करून पुण्याच्या बाजूला असणाऱ्या लेन देखील कार्यकर्त्यांनी व सातारा जावलीच्या जनतेने खुल्या केल्या. त्यामुळे सकाळी 11 वाजले पासून खुला झालेला टोलनाक्यामुळे वहानधारकांच्यात समाधान होते.

वेळेची किंमत कशी मोजणार?

पुणे मुंबईला जायचे म्हटले तर प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. पेशंट, नोकरदार वर्ग मुलाखतील जाणारे युवा वर्ग यांच्या होणाऱ्या नुकसानीला हे रिलायन्स 
इन्फ्रा जबाबदार आहे. त्यांच्या वाया जाणाऱ्या वेळेची किंमत कशी मोजणार त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीने घ्यावी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे टोलबाबत आश्वासन

महामार्गाच्या कामासाठी हजारों कोटिंचे टेंडर दिले जाते,मग रसत्यांची कामे निकृष्ठ कामे केली असून मोठे उड्डान पुल कामे झाल्यानंतर दोन महिन्यात पडतात अश्या कामाचे स्ट्रकचरल ऑडिट झाले पाहिजे यासाठी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी महामार्ग प्राधिकरण रिलांयस इन्फ्रा सातारकर जनता यांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे

15 जानेवारीचा अल्टीमेटम पुन्हा

रिलायंस इन्फ्राच्या वरिष्ठ अधिकारी व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटिल यांनी मध्यस्थिकरीत टोल बंद आंदोलन मिटविन्यासाठी प्रयत्न केला, यावेळी रिलांयस इन्फ्रा कडून 15 जानेवारीचा पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला असून 28 डिसेंबर पर्यंत खड्डे मुजवीणार व 15 जानेवारी पर्यंत पूर्ण रसत्याला कारपेट करणार असल्याचे लेखी मागण्या मान्य केल्या.

टोल नाक्यावर पोलिसांचा खडा पहारा

टोल बंद आंदोलनांच्या पार्श्व भुमिवर सकाळी आठ पासून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फ़ौज फाटा तैनात करण्यात आला होता,पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटिल,विभागीय पोलिस अधीक्षक अजित टिके, भुइंज् पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्याम बुवा मेढ़ा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड़ यांच्यासह शीघ्र पोलिस कृति दलाच्या दोन तूकडया तैनात होत्या.

जरुर वाचा -  Video आनेवाडीत रोज 30 लाखांची टोल वसुली

या आंदोलनात सातारा पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, जावली पंचायत समिति सभापती जयश्री गिरी, जिल्हा बँक संचालिका कांचन साळुंखे, नगरसेवक धनंजय जांभळे, अमोल मोहिते, अशोक मोने, जावलीचे माजी सभापती सुहास गिरी, फिरोज पठान, नितीन पाटील ,पंचायत समिती सदस्य सरिता इंदलकर, प्रकाश बड़ेकर, प्रविण देशमाने, जयदीप शिंदे, जावली भाजपा अध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्यासह सातारा जावली तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinhraje Bhosale Gave 30 Days Of Tenure To Reliance Infra For Developing Pune Banglore National Highway Road