आंदोलन शिवसेनेनेच करावे,  हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे ः सांगलीत खिल्ली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शिवसेनेचा नाद भाजपाने करू नये. अन्यथा कोरोना संपल्यानंतर शिवसेना जशास तसे शिवसेना स्टाईलने उत्तर देईल. आंदोलन करावे तर शिवसेनेने... हे काम नव्हे येड्या गबाळ्याचे नव्हे, अशी खिल्ली उडवण्यात आली

सांगली ः भाजपच्या राज्य सरकार विरोधी आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आज शिवसेनेने जिल्हाभर प्रतिआंदोलन केले. "आम्ही ठाकरे सरकारसोबत', असे फलक घेऊन शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडकावला. कोरोनाच्या संकट काळात भाजपने आंदोलनाचे नाटक सुरु केले आहे, असा आरोप जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केला. 

भाजपाचे आंदोलन सुरु असतानाच त्याच्या विरोधात शिवसेना आणि युवा सेना सांगली जिल्ह्यावतीने महाराष्ट्र सरकारच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. सर्व तालुके, शहरांमध्ये सर्व नियमांचे पालन करून आंदोलन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली खानापुर तालुक्‍यात तालुका प्रमुख सतीश निकम, शहरप्रमुख राजू जाधव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद कदम उपस्थित होते. विटा शहरांत आंदोलन झाले. 

श्री. विभुते म्हणाले, ""भाजपाचे महाराष्ट्र विषयी असलेल बेगडी प्रेम हे सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. गेलेली सत्ता परत येणार नाही हे आता त्यांच्या लक्षात आले आहे. स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदार फुटून जाऊ नयेत, यासाठी महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी धूळ फेकण्याचा काम केलं जात आहे. हे नाटके आंदोलन आहे.'' 

ते म्हणाले, ""भाजपने पाच वर्षाच्या काळामध्ये आपण काय दिवा लावला. संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे शिवसेनेचा नाद भाजपाने करू नये. अन्यथा कोरोना संपल्यानंतर शिवसेना जशास तसे शिवसेना स्टाईलने उत्तर देईल. आंदोलन करावे तर शिवसेनेने... हे काम नव्हे येड्या गबाळ्याचे नव्हे, अशी खिल्ली उडवण्यात आली.'' अमर कदम ओंकार घाडगे सचिन महाडिक प्रतीक पवार धनाजी लोटके प्रवीण डुबल चंद्रकांत ढोली आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena against bjp in sangli