'या' जिल्ह्यात पालकमंत्रिपदासाठी सेना-राष्ट्रवादीत स्पर्धा ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

उध्दव ठाकरे आणि शरद पवार कोणाची मागणी पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या नावाचा पर्यायही ठेवल्याचे सांगितले जात आहे.

सातारा : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना साताऱ्याचे पालकमंत्री कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीतील नेत्यांनी साताऱ्याचे पालकमंत्रिपद आपल्या पक्षाकडेच असावे, यासाठी दोन्हीकडच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आग्रह धरण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला आपली ताकद अबाधित राखण्यासाठी, तर जिल्ह्यातील शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी पालकमंत्रिपद हवे आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
साताऱ्याचे पालकमंत्रिपद आजपर्यंत दिग्गज नेत्यांनी भूषविले आहे. यामध्ये सर्वाधिक कारकीर्द गाजली ती अजित पवार यांची. प्रशासनावर पकड आणि तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी लावण्याची त्यांची हातोटी हे त्यामागचे मुख्य कारण होते. जिल्ह्यात सुरवातीला कॉंग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर अनेक वर्षे पालकमंत्री होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार, अभयसिंहराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर (दोन वेळा), शशिकांत शिंदे आणि मागील वेळी शिवसेनेचे विजय शिवतारे पालकमंत्री होते.

पालकमंत्रिपदाचा सर्वाधिक काळ राष्ट्रवादीस

या सर्व नावांत सर्वाधिक काळ राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राहिले. आता नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये तीन पक्षांचा समावेश असल्याने साताऱ्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

या आधी पालकमंत्रिपद शिवसेनेकडे असल्याने पुन्हा शिवसेनेलाच संधी दिली जावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. यासंदर्भात ते उध्दव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरणार आहेत. तसे झाल्यास शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंचा विचार होऊ शकतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पालकमंत्रिपद हे आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि प्रमुख नेत्यांनी शरद पवारांकडे केली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत स्पर्धा लागली आहे.

अजित पवारांचा पर्याय

सरकारमध्ये शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम असेल. सध्यातरी राष्ट्रवादीकडे पालकमंत्री म्हणून धडाकेबाजपणे काम करणारा माणूस नाही. शिवसेनेकडे शंभूराज देसाई हे कडक स्वभावाचे व प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरही अंकुश ठेऊ शकतील, असे नेतृत्व आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाचा रेटा लावला आहे.

हेही वाचा -  आयाराम विराेधी बाकांवरच ! ; आता विकासाचे काय ?

पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीकडून सर्वाधिक ताकद लावली जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील कोणाला नाही तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले जाऊ शकते. हा निर्णय खासदार पवार यांच्या हातात असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena And Nationalist Congress Party Workers Demands Parentministry