Shivsena Demand For Kolhapur ZP President Election Marathi News
Shivsena Demand For Kolhapur ZP President Election Marathi News

पाठींबा हवा असेल तर शिवसेनेने ठेवला हा प्रस्ताव...

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कोणालाच सत्ता मिळवता येत नाही, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर अध्यक्षपद आम्हाला द्या, असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडे दिल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले, तर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या पाठिंब्याचा निर्णय सदस्यांनी चर्चा करून घेऊ तथापि सत्तांतर अटळ असल्याचा दावा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, या निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी भाजपची बैठक उद्या (ता. २७) हॉटेल जोतिबा येथे होत आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २ जानेवारी रोजी आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. हाच फॉर्म्युला राज्यातील जिल्हा परिषदेत राबवावा, यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांचा आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेच दहा सदस्य आहेत. गेल्यावेळी यापैकी सात सदस्य भाजपसोबत होते. यावेळच्या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय घेण्यासाठी श्री. दुधवडकर आज कोल्हापुरात आले होते. सकाळी श्री. दुधवडकर यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

सेनेच्या पाठींब्या शिवाय सत्ता अशक्य

श्री. दुधवडकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची बैठक घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली. शिवेसनेला घेतल्याशिवाय कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. याबाबत नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आज याबाबत निर्णय घेऊ. तत्पूर्वी शिवसेनेच्या सदस्यांशी चर्चा केली जाईल.’’

करवीर पंचायत समितीतील उपसभापतिपद ही हवे

नरके म्हणाले, ‘‘विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात लढली आहे. त्यानंतर याच तिन्हीही पक्षांचे सरकार सत्तेत आले. हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत वापरला गेला पाहिजे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असेल तर अध्यक्षपद आम्हाला द्यावे, असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसला दिला आहे. अनेक पंचायत समितीतही शिवसेनेच्या पाठिंब्यावरच दोन्ही काँग्रेसची सत्ता येणार आहे. त्या बदल्यात आम्हाला उपसभापतिपद द्यावे, असेही सुचवले आहे. करवीर पंचायत समितीतील उपसभापतिपद शिवसेनेला मिळावे, अशीही मागणी केली आहे. याशिवाय गोकुळ, जिल्हा बॅंक अशा सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला संधी मिळाली पाहिजे. या प्रस्तावाला त्यांच्याकडून काय उत्तर येईल, त्यावर शिवसेनेची भूमिका अवलंबून असेल.’’

संजय घाटगे अनुपस्थित

बैठकीला शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे अनुपस्थित होते. श्री. घाटगे यांचे पुत्र अंबरिश शिवसेनेचे सदस्य व विद्यमान शिक्षण समिती सभापती आहेत. अंबरिश यांचे सासरे अरुण इंगवले हे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच या दोघांनाही या बैठकीला पाठ फिरवल्याचे समजते. 

दुधवडकर-सतेज पाटील चर्चा

दरम्यान, सायंकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी विश्रामगृहावर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची भेट घेतली. या दोघांत बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. शिवसेनेच्या प्रस्तावावर या दोघांत खलबते झाल्याचे समजते. या वेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर आदी उपस्थित होते. 

भाजपची आज बैठक

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक उद्या (ता. २७) सायंकाळी हॉटेल जोतिबा येथे बोलविली आहे. बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, डॉ. विनय कोरे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, संजय घाटगे उपस्थित राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com