
शिवसेनेत महिनाअखेर खांदेपालट गद्दाराचा हिशेब होणार ; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष..
याठिकाणी हाेणार शिवसेनेत माेठया घडामोडी....
कोल्हापूर : शिवसेनेत कोण प्रामाणिक आणि कोण गद्दार? याचा हिशेब या महिनाअखेरीस होणार आहे. पदाधिकारी बदलण्याची मोहीम पक्षस्तरावर हाती घेतली असून, पदाधिकाऱ्यांची नव्याने रचना होणार आहे.
महाविकासआघाडीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यात मुख्यमंत्र्यापदाची धुरा वाहत असल्याने नव्या सरकारला स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ लागला. पालकमंत्र्यांचे जिल्हे निश्चित झाल्यानंतर शिवसेनाअंतर्गत पदाधिकारी बदलण्याच्या प्रक्रियेस सुरवात होणार आहे.
हेही वाचा - एसटी चालकाचा सुटला ताबा अन....
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शाखाप्रमुख, महिलाप्रमुख, जिल्हा तसेच शहराच्या बॉडीचा नव्याने विचार होणार आहे. मागील सरकारच्या काळात शिवसेनेचे सहा आमदार होते. लोकसभा निवडणुकीत नव्याने दोन खासदारांची भर पडली. झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच आमदार पराभूत झाले आणि हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला. लोकसभा निवडणुकीत ज्यांना मदत केली, त्यांचा पैरा फेडण्याचे काम झाल्याने काही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले.
गळ्यात भगव्या रंगाचा स्कार्प गळ्यात
उर्वरित विधानसभा मतदारसंघात आजी-माजी शिवसैनिकच विद्यमान उमेदवाराविरोधात उतरले. सभा, आंदोलने, जाहीर सभा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी गळ्यात भगव्या रंगाचा स्कार्प घालायचा आणि प्रत्यक्ष निवडणूक आल्यानंतर आपलाच उमेदवाराविरोधात कसा पराभूत होईल, यासाठी पडद्यामागून प्रयत्न करायचे, हे आता लपून राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीत कोण पक्षाचे काम करतो आणि कोण नाही?
हेही वाचा - कोल्हापूरातील तरुण का चालले या वाटेने...?
यासाठी त्रयस्थ यंत्रणा नियुक्ती केली.
जिल्हा आणि शहर अशा दोन गटात शिवसेनेचे पदाधिकारी विभागले आहेत. विधानसभा निवडणुकीत काहीजणांनी उघडपणे उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली. ही मंडळी रेकॉर्डवर आली नाहीत पण विरोधातील उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. एकीकडे शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जयघोष करायचा आणि दुसऱ्या बाजूला आमचा पक्षाला नव्हे तर उमेदवाराला विरोध आहे, असे सांगायचे या बाबींचा विचार नव्याने पदाधिकारी नियुक्तीवेळी होणार आहे.
पक्षाशी कोण प्रामाणिक आणि कोण नाही?
राज्यात स्थापन झालेले नवे सरकार, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे पदाधिकारी बदलण्याचा कार्यक्रम लांबणीवर पडला ; मात्र पक्षाशी कोण प्रामाणिक आणि कोण नाही? याचा हिशेब या महिनाअखेर निश्चितपणे होईल.
- अरुण दुधवडकर, संपर्कप्रमुख