असा होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा सांगलीशी ऋणानुबंध  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असा होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा सांगलीशी ऋणानुबंध 

शिवाय त्यांच्या शिवचरित्रावर आधारीत ‘जाणता राजा’ या गाजलेल्या महानाट्याचे तीन वेळा प्रयोगही झाले होते.

असा होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा सांगलीशी ऋणानुबंध 

सांगली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सांगलीशी जवळचा ऋणानुबंध होता. त्यांच्या शिवचरित्रात सांगलीतील शिवकालीन घटनांचा संदर्भ आहे. शिवाय त्यांच्या शिवचरित्रावर आधारीत ‘जाणता राजा’ या गाजलेल्या महानाट्याचे तीन वेळा प्रयोगही झाले होते. याबरोबरच त्यांची अनेकवेळा व्याख्यानेही झाली होती. त्यांच्या सांगलीशी असलेल्या स्मृती जाग्या झाल्या. 

इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले, बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या अगदी उमेदीच्या काळात शिवरायांचे चरित्र लिहिण्यापुर्वी त्यांनी शिराळा, मिरज, उमराणी या शिवकालीन भागांचा दौरा करून शिवचरित्राशी संबंधीत स्थळांची पाहणी केली होती. मिरजेचा किल्ला त्यांनी फिरून पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या शिवचरित्रात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वधानंतर नेताजी पालकर यांच्याकडे दक्षिण महाराष्ट्रातील आदिलशाही ठाणी जिंकण्याची कामगिरी सोपविली होती. त्यामध्ये कुंडल, वाळवा, मिरज परिसरावर त्यांची स्वारी कशी झाली, याचे साद्यंत वर्णन आले आहे’. बाबासाहेबांनी मिरजेच्या भुईकोटाची प्रत्यक्ष पाहणी केल्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांच्या स्वारीचे वर्णन अतिशय बारकाईने करताना मिरज भुईकोट किल्ल्याचे सुंदर वर्णन आपल्या शिवचरित्रात केले आहे.

हेही वाचा: सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब हे शिवप्रतिष्ठानच्या मोहिमेत सहभागी झाल्याचे प्रतिष्ठानचे मिलिंद तानवडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘बाबासाहेब पन्हाळा ते विशाळगड या मोहीमेत सहभागी झाले होते. गजापूर येथे ते आले होते. याशिवाय रायगड येथे बसविण्यात आलेल्या रोप वेला शिवप्रतिष्ठाने विरोध केला. त्याच्या समर्थनार्थ बाबासाहेब सांगलीत आले होते. अत्यंत शांत, सयंमी आणि अभ्यासू असे व्यक्तीमत्व होते.’

जाणता राजाचे तीनवेळा सांगलीत प्रयोग

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर आधारीत निर्मिती केलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे सांगलीत तीनवेळा प्रयोग झाले आहेत. शिवप्रेमी मंडळाने त्यांच्या या नाटकाचे प्रयोग राजवाड्यातील पटांगणात आयोजित केल्याची आठवण इतिहासाचे अभ्यासक सदानंद कदम यांनी सांगितली. त्यानंतर सांगली अर्बन बॅंकेनेही या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते. तसेच कसबे डिग्रजच्या चव्हाण सरकारांनीही या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते. तरुण भारत स्टेडियमवर हे प्रयोग झाले होते. त्यावेळी सांगलीकरांनी या नाटकांना हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. अवघी सांगली शिवमय होत असे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय

१९६५ सालापासून सांगलीत व्याख्याने

बाबासाहेब पुरंदरे यांचे सांगलीतील घारपुरे आणि तेलंग कुटुंबांशी जवळचे संबंध होते. ते सांगलीत आले की या दोन्ही घरी आवर्जून भेट देत असत. याबाबत अशोक घारपुरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सांगलीत बाबासाहेब पुरंदरे यांचे १९६५ साली प्रथम राजवाड्यातील पटांगणात व्याख्यान झाले होते. त्यावेळी पाच दिवस त्यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले. त्यानंतर १९७७ मध्ये पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणात १० दिवस व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेच्या माध्यमातून बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी, तसेच शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी गोळा करण्यात आला होता.

loading image
go to top