धक्कादायक ः दुबईहून आलेले २२ सराफ चाचणी करून घेईनात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

जिल्हा प्रशासनाने 15 फेब्रुवारीनंतर विदेशातून येणाऱ्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करणे बंधनकारक केले आहे. असे असताना सराफांची ही टीम बिनधास्त नगरमध्ये वावरत असल्याचे समोर आले आहे.

नगर ः दुबईवरून तीन मार्च रोजी आलेल्या येथील 22 सराफांनी अद्याप कोरोना चाचणी न केल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. एका नागरिकाने याबाबत थेट जिल्हा प्रशासनाला कळविले.

प्रशासनाने तत्काळ सराफांशी संपर्क साधून, जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याच्या सूचना केल्या. मात्र, काही केल्या हे सराफ रुग्णालयात यायला तयार नाहीत. कुणालाही न जुमानता ते मोकाट फिरत आहेत. अशा बेजबाबदार सराफांना पोलिस बंदोबस्तात तपासणीसाठी आणावे; अन्यथा कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा प्रशासनाने 15 फेब्रुवारीनंतर विदेशातून येणाऱ्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करणे बंधनकारक केले आहे. असे असताना सराफांची ही टीम बिनधास्त नगरमध्ये वावरत असल्याचे समोर आले आहे.

लोकांना ते आम्ही तपासणी केली असल्याचे सांगत असून, त्यातून त्यांना कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. प्रशासनाने तातडीने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधमोहीम सुरू करणे गरजेचे आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर तातडीने कारवाई होण्याची गरज आहे. आज रात्री उशिरापर्यंत हे 22 जण रुग्णालयात दाखल झाले नव्हते. 

दुबईवरून आलेल्या सर्व लोकांना काल रात्री भ्रमणध्वनीवरून तातडीने तपासणीबाबत सूचना केल्या. मात्र, अद्यापही ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आलेले नाहीत. त्यामुळे आज उशिरापर्यंत ते न आल्यास पोलिस बंदोबस्तात सर्वांना तपासणीसाठी आणले जाईल. 
- अनिल बोरगे, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: 22 Sarafis from Dubai are not tested