अन्यथा बेमुदत शाळा बंद ठेवणार: अशोकराव थोरात

विजय लोहार
Sunday, 20 December 2020

गेल्या वीस वर्षात शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला आहे .

नेर्ले (सांगली) : शासनाकडून शिक्षण संस्थांचे थकीत वेतनेत्तर अनुदान मिळत नसल्याने पुढील महिन्यात बेमुदत 
शाळा बंद ठेवणार असल्याचा इशारा कोल्हापूर विभाग शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कोल्हापूर विभागातील संस्थाचालकांची सभा श्री मळाई देवी शिक्षण संस्था मलकापूर कराड येथे झाली.या सभेत वेतनेतर अनुदान न मिळाल्यास पुढील महिन्यात बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.अशोकराव थोरात म्हणाले," गेल्या वीस वर्षात शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला आहे .त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन स्तरावर घेतले जाणारे निर्णय संस्थाचालकांचे मत विचारात न घेता घेतले जातात. वेतनेतर अनुदान बंद केल्यामुळे शाळांमध्ये अनेक सुविधांचा अभाव निर्माण होईल. त्यामुळे गुणवत्ता ढासळेल, मुलांचे आरोग्य धोक्यात येईल.

समाजातील भावी पिढी घडवण्याचे काम करण्याच्या शिक्षण संस्थांना हतबल करून शासनाला नेमके काय साध्य करावयाचे आहे?शिक्षण क्षेत्रात घेतले जाणारे अनेक चुकीचे निर्णय समाजविघातक आहेत. त्यामुळे गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील .स्वयंअर्थसहाय्यित किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांत गरिबांची मुले शिकणार का?
 शाळांचे वेतनेतर अनुदान बंद केल्यास त्यांना सुविधा कशा पुरवायच्या ? त्यातच चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती बंद केली.

शिक्षक भरती बंद आहे .चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी ही नसतील तर शाळा चालवायच्या कशा ?  शिक्षणापासून भावी पिढीला दूर ठेवायचे का ? आपल्या निर्णयात शासनाने बदल करावा. शिवाजी माळकर म्हणाले,"२००० सालापासून वेतनेतर अनुदान बंद करण्यात आले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेतनेतर अनुदान आवश्यक आहे .परंतु शासनाची याबाबत अनास्था आहे.यावेळी अमर पाटणकर , श्री.बालवडकर ,श्री गुरव , चंद्र धारूरकर, सचिन सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .संजीवनी शिक्षण संस्थेचे ए.आर. पाटील यांची उपस्थिती होती.या बैठकीत एस.टी सुकरे यांनी प्रास्ताविक केले .

संस्थाचालकांचा शासनावर रोष
शिक्षण क्षेत्र अगोदर'विनोदाच्या तावडीत सापडले.आता विविध पद्धतीने शिक्षण नष्ट करण्याचा 'वर्षाव'होत असल्याची टीका झाली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shokrao Thorat vice president of Kolhapur Divisional Education Corporation warned the school closed