सांगली बसस्थानकातून खासगी वाहनचालकाना "शॉर्टकट'

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 23 September 2020

सांगली : येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा नेहमी गजबजलेला परिसर सध्या मोकळा झालेला दिसत असल्यामुळे अनेक खासगी वाहनचालक व दुचाकीस्वारांनी "शॉर्टकट' म्हणून राजरोस त्याचा वापर सुरू केला आहे.

सांगली : येथील मध्यवर्ती बसस्थानकातील फलाट फेऱ्या कमी झाल्यामुळे फलाट रिकामेच दिसतात. स्थानकाचा नेहमी गजबजलेला परिसर सध्या मोकळा झालेला दिसत असल्यामुळे अनेक खासगी वाहनचालक व दुचाकीस्वारांनी "शॉर्टकट' म्हणून राजरोस त्याचा वापर सुरू केला आहे. कोरोनामुळे स्थानकावरून बसेसच्या फेऱ्या कमी आणि अन्य वाहनांची वर्दळ असे चित्र दिसून येत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे सध्या बसेसच्या फेऱ्या ठराविक मार्गावरच सुरू आहेत. जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा मार्गावर एसटी बसेस धावत आहेत; परंतु प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच बसेस पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत आहेत; परंतु काही मार्गांवर निम्म्या क्षमतेनेदेखील प्रवासी भरले जात नाहीत. त्यामुळे तोट्यातच फेऱ्या कराव्या लागत आहेत. फेऱ्या कमी असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला महिन्यातून काही दिवसच काम शिल्लक राहिले आहे. त्याचाच परिणाम सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानक रिकामेच दिसते. 

फलाटावर गर्दी नसल्यामुळे मोकळ्या स्थानकाचा दुचाकी व खासगी वाहनचालकांनी बिनधास्तपणे वापर सुरू केला आहे. बसस्थानकासमोरील रस्ता एकेरी असा आहे. तेथे पोलिस कारवाई करतात. त्यामुळे थेट बसस्थानकातून झुलेलाल चौकाकडे जाण्यासाठी आतमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने घुसवली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एसटी कर्मचारीच उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे. एवढेच नव्हे, तर बसस्थानकाचा परिसर खड्डेमय बनला आहे. तेथे पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. त्याकडे लक्ष देण्यासही प्रशासनाला वेळ नसल्याचे चित्र दिसून येते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Shortcut' to private drivers from Sangli bus stand