आम्ही कोल्हापुरी ! मटण दरवाढीवर आमचा असाही तोडगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

विक्रेत्यांनी मटणाचे दर 550 ते 600 रुपये किलो केले आहेत. शहर सोडले की ग्रामीण भागात मटण 400 ते 500 रुपये किलो दराने मिळते. मग शहरातच दर जास्त का?, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत मटण विक्रेत्यांबरोबर बैठकच घेतली; पण विक्रेते दरावर ठाम राहिले.

कोल्हापूर - शासकीय काम, पासपोर्ट, मतदान यासाठी आधार कार्ड लागते. मात्र, शहरात आज चक्क आधारकार्ड दाखवा आणि मटण घ्या, असा अभिनव उपक्रम संयुक्त राजारामपुरी मित्रमंडळाने केला. राजारामपुरी पहिल्या गल्लीत त्यांनी मटण विक्रीचा स्टॉल लावला होता. यातून त्यांनी मटण दरवाढीचा निषेध केला आणि नागरिकांना 425 रुपये किलो दराने मटण विक्री केली. अशाच प्रकारे तटाकडील तालीम मंडळानेही 400 रुपये दराने मटण विक्री करून नागरिकांना स्वस्तात मटण उपलब्ध करून दिले. यासाठी या मंडळाने बकरी खरेदी केली व स्वस्तात मटणाची विक्री केली.

विक्रेत्यांनी मटणाचे दर 550 ते 600 रुपये किलो केले आहेत. शहर सोडले की ग्रामीण भागात मटण 400 ते 500 रुपये किलो दराने मिळते. मग शहरातच दर जास्त का?, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत मटण विक्रेत्यांबरोबर बैठकच घेतली; पण विक्रेते दरावर ठाम राहिले. मग तालीम संघांनी आपणच मटणाची विक्री करायची, असा निर्णय घेतला.

एका हातात डबा, एका हातात आधार कार्ड

त्याप्रमाणे आज संयुक्त राजारामपुरी मित्रमंडळाने पहिल्या गल्लीत मटण विक्रीचा स्टॉल उभा केला. येथे नागरिकांनी यावे, आधार कार्ड दाखवावे आणि 425 रुपये किलो दराने चांगले मटण न्यावे, अशी कल्पना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राबवली. सकाळी साडेसातला सुरू झालेल्या या स्टॉलवर लोकांच्या रांगा लागल्या. हातात डबा घेऊन आधार कार्ड दाखवून ते मटण खरेदी करत होते. स्थानिक माणसांना मटण मिळावे, हा आधारकार्ड दाखवण्यामागचा उद्देश होता. 

या स्टॉलवर 11 वाजेपर्यंत पाच बकरी संपली. पुढच्या रविवारीही हा स्टॉल लावला जाणार आहे. अशाच पद्धतीने तटाकडील तालीम मंडळानेही मटण विक्रीचा स्टॉल उभारला होता. त्यांनी 400 रुपये किलो या दराने मटण विक्री केली. इथेही 50 किलो मटण खपले. 

विक्रीची शक्कल सोशल मीडियावर... 

मटण दराचा दोन आठवड्यांपासून सुरू असणारा हा वाद आता चिघळला आहे. मटणाच्या दराबाबत वेगवेगळ्या ठिकाणी बैठका सुरू आहेत. मात्र, कोल्हापूरकरांनी लढवलेली मटण विक्रीची शक्कल सोशल मीडियावर मात्र चर्चेसाठी चांगलीच रंगली आहे. 

यासाठीच मटण विक्रीचा स्टाॅल

कोल्हापुरात आठवड्यातून एकदा मटण खाण्याची पद्धत आहे. मात्र, विक्रेत्यांनी मनमानी पद्धतीने केलेल्या मटण दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर याचा बोजा टाकला जात आहे. म्हणूनच आम्ही राजारामपुरीत मटण विक्रीचा स्टॉल उभा केला. 
- ऍड. बाबा इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते. 

मटणाच्या दरावर नियंत्रणासाठीच ..

स्वस्त दराने मटण मिळते आणि ते विकून नफाही मिळतो, हे लोकांना सांगण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे मटणाच्या दरावर नियंत्रण असले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. 
- राजू जाधव, सचिव, तटाकडील तालीम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show Aadhaar card And Buy Mutton In Kolhapur