"पाटबंधारे'च्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस 

अजित झळके 
Friday, 22 January 2021

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेला परवानगी न घेता गैरहजर राहिल्या प्रकरणी म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा निर्णय आज समितीने घेतला.

सांगली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेला परवानगी न घेता गैरहजर राहिल्या प्रकरणी म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा निर्णय आज समितीने घेतला. जिल्हा परिषदेच्या बैठकांना कमी लेखून त्याकडे पाठ फिरवण्याचे सातत्याने प्रकार होत असल्याने आज सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

या बैठकीला वन विभागाचे अधिकारीही गैरहजर होते. त्यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यात कार्वे (ता. वाळवा) येथील बंधाऱ्याचे काम ठेकेदाराने पुढील आठ दिवसांत सुरु केले नाही तर त्याच्यावर कारवाईची सूचना देण्यात आली. 

राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजनांचे आराखडे मंजूरीसाठी पाठवले आहेत, त्यांची एक प्रत सदस्यांना देण्याची सूचना केली. स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन मधील सांडपाणी व्यवस्थापन ऍपमध्ये जिल्ह्यातील 79 गावांचा समावेश करण्याचे राहिले आहे. ते काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली. भूलजल सर्वेक्षम आणि विकास यंत्रणेकडील जलभंजन कार्यक्रमाचे उद्दीष्ट मार्चअखेर पूर्ण करण्याची सूचना दिली. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show cause notice to "Irrigation" officials