हिरकणी कक्षच झालाय 'शोपीस'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे.

निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

स्तनदा मातांना आपल्या लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. मात्र, हे कक्ष मातांना स्तनपान करण्यास योग्य राहिले नाहीत. फलटण बस स्थानकावर असलेला हा हिरकणी कक्ष मात्र केवळ नावालाच उरला आहे. या कक्षात कसल्याच सुविधा नसल्याने त्याचा वापर फिरस्ते, भिकारी व स्थानकातील भंगार ठेवण्यासाठी होत आहे. कक्षाच्या दुरवस्थेमुळे स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. 

राज्यातील ग्रामीण दुर्गम भागातून दररोज हजारो लोक एसटीने प्रवास करतात. विशेष म्हणजे बहुतांश महिला बाळाच्या आरोग्य तपासणीसाठी एसटीनेच तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जातात. तालुक्‍यातून ग्रामीण भागात जाण्यासाठी फलटण आगारातून तास, दीड तासाला बस असते किंवा दिवसातून मोजक्‍याच गाड्या असतात. अशा वेळी महिलांना आपल्या बाळासह बस स्थानकात बसून बससाठी प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी गर्दी असलेल्या बस स्थानकात बाळांना असे उघड्यावर दूध पाजताना महिलांची कुचंबणा होते. ही गैरसोय लक्षात घेऊन परिवहन महामंडळाने अशा स्तनदा मातांसाठी बस स्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन केला आहे. हा हिरकणी कक्ष फलटण बस स्थानकातही उभारला आहे. 

फलटण बस स्थानकावरून नांदेड, बीड, लातूर, बारामती, शिर्डी, हैदराबाद, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी, मुंबई, पुणे, सातारा या महत्त्वाच्या शहरांना बस जातात, तर या आगारांच्या बसही मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. परिणामी या स्थानकात प्रवाशांची संख्या त्यातही महिलांची संख्या जास्त असते. येथे हिरकणी कक्ष स्थापन झाल्यापासून हा कक्ष अवघे काही दिवसच सुस्थितीत होता. परंतु, आता या कक्षाची दुरवस्था झाली आहे. या कक्षाचा वापर महिलांऐवजी मोकाट जनावरे व फिरस्ते भिकारी करीत आहेत. दुरवस्थेमुळे महिलांना या कक्षाचा वापर करता येत नाही.
 

सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी 
दरम्यान, हा कक्ष केवळ नावालाच राहिला असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. या कक्षाची दुरुस्ती करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे. जेणेकरून महिलांना त्याचा वापर करता येईल आणि त्यांची गैरसोय टळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: showpiece of Hirakani room