हिरवळ दाटे चोहीकडे...

हिरवळ दाटे चोहीकडे...

चांदोली धरण
शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे मुलांसाठी पर्वणी ठरेल. जिल्ह्यातील सर्वांत मोठी निसर्ग संपदा येथे भेटेल. सर्वाधिक पाऊस येथेच बरसतो. सांगलीतून चांदोली १०१ किलोमीटर आहे. वाराणावतीत उत्तम भोजनाची सोय होते. शिवाय काही रिसॉर्टही सुरू आहेत.

गुढे पाचगणी
प्रचंड वेगाने वाहणारे वारे अनुभवायचे असेल आणि पवनचक्‍क्‍यांची शेती पाहायची असेल तर गुढे पाचगणी उत्तम पर्याय. शिराळ्यातून शेडगेवाडी, येळापूर, मेणीमार्गे जाता येते. या हिरव्यागार पठारावरील गवतात लोळण्याची मजा काही औरच.

शित्तूर आगरकडा
शिराळ्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावरील हा धबधबा शाहूवाडी तालुक्‍याच्या हद्दीत येतो, मात्र सांगली जिल्ह्यातूनही त्याची वाट जाते. शित्तूर गावात गाडी लावून थोडे अंतर चालले की हा धबधबा आहे. 

सागरेश्‍वर अभयारण्य
कडेगाव तालुक्‍यातील सागरेश्वर अभयारण्य निसर्ग पर्यटनाची पर्वणीच. राज्यातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य. सांगलीपासून ४० किलोमीटर अंतर. सह्याद्रीच्या कुशीत १० किलोमीटर विस्तार. विपूल वनसंपदा. हरीण, काळवीट, सांबर, चितळ, ससा, खार, साळिंदर, लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे अनेक वन्यजीवांचे येथे दर्शन होते. पक्षीनिरीक्षणाची हौसही फिटते. १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची येथे नोंद झालीय. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ‘ग्रास ज्युवेल’ येथे विहारते. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध ‘पेटंट लेडी’ फुलपाखरू इथं भेटतं. किर्लोस्कर पाँईंटवरून कृष्णा नदीचे विहंगम दृश्‍य नजरेत साठवण्याचा आनंद औरच. रणशूळ पाॅईंट, काळभैरव मंदिर लक्षवेधी आहे.

उखळू धबधबा
चांदोली धरणापासून म्हणजे वारणावतीपासून ११ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. उखळू गावात वाहन लावून साधारण पाच ते सहा किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. जंगलातून वाट तुडवण्याचा आनंद घेतानाच धबधब्याखाली आंघोळ करू शकता. जेवन सोबत घ्यावे लागेल किंवा वाराणवतीतच त्याची सोय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com