पंढरपूरः दर्शन काळाबाजारप्रकरणी निलंबनाचा ठराव बहुमताने

अभय जोशी
Friday, 7 September 2018

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत आज (शुक्रवार) बहुमताने करण्यात आला. बेताल वक्तव्य केलेले दुसरे सदस्य आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. पक्ष पातळीवर त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत आज (शुक्रवार) बहुमताने करण्यात आला. बेताल वक्तव्य केलेले दुसरे सदस्य आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. पक्ष पातळीवर त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झटपट दर्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाविकांकडून पैसे घेतले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांसह मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अपेक्षेप्रमाणे आजच्या बैठकीत त्या गंभीर विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

बैठकीत सदस्य अधटराव याने त्याची बाजू मांडली. ती ऐकल्यानंतर दर्शनाचा काळाबाजार करुन समितीची बदनामी करणाऱ्या अधटरावचे निलंबन करण्याचा ठरावसर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव विधी व न्याय विभागाकडे पाठवून दोन दिवसात अधटरावचे निलंबन करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्या संदर्भातही चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

संत तुकाराम भवन बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉ. भोसले यांची गाडी अडवून आमदार राम कदम यांचे निलंबन करण्याची मागणी केली.

प्राथमिक सुविधा नंतरच टोकन पध्दत
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तथापी त्या व्यवस्थेसाठी मोठे हॉल बांधावे लागणार आहेत. पत्राशेडच्या ठिकाणी हे हॉल बांधण्यात येणार असून, उड्डाणपूलाचे उर्वरीत काम करुन तो हॉलला जोडला जाणार आहे. ऑक्टोबर अखेर पर्यंत भक्त निवासचे काम पूर्ण केले जाणार आहे.

बडवे, उत्पात, सेवाधाऱ्यांचा सहानुभूतीने विचार
बडवे उत्पात सेवाधाऱ्यांच्यानिवेदना विषयी डॉ. भोसले म्हणाले, या मंडळींनी मंदिराची सेवा केली. निश्चित काही त्रुटी राहिल्या असतील. परंतु, मंदिराचे संरक्षण आणि काळजी अनेक वर्षे त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा विचार कायद्याला अधिन राहून सहानुभूतीने केला जाईल.

पृथ्वीराज बाबांनी काय दिवे लावले ते सांगावे
दर्शन पास विक्री मागे सोनेरी टोळी आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपुरात दोन दिवसापूर्वी केला होता त्या संदर्भात डॉ. भोसले म्हणाले, श्री. चव्हाण हे आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी बोलत होते नंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोलत होते आता ते माझ्या विषयी बोलू लागले आहेत. त्यांना जनाधार राहिलेला नाही. विधानसभा निवडणूकीनंतर ते सर्व निवडणूका हरलेले आहेत. मतदार संघाचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नसून त्यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे ते बेताल वक्तव्ये करत आहेत. श्री. चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूरसाठी काय केले ते आधी सांगावे आणि मग त्यांनी आमच्या कामा विषयी बोलावे. त्यांच्या मूळ कुंभारगावात त्यांचा सरपंच नाही. ज्या कराडशहराने त्यांना मागील निवडणूकीत आघाडी दिली तिथे त्यांचा नगराध्यक्ष नाही. त्यामुळे आधी त्यांनी गावाकडे लक्ष द्यावे आणि मग राज्यातील घटनांविषयी बोलावे, असा टोला डॉ. भोसले यांनी चव्हाण यांना लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shri vitthal rukmini bogus darshan pass issue at pandharpur