सांगलीत "जनता कर्फ्यू' मुळे शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

सांगली-सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची आणि नागरिकांची गर्दी...गाड्यांच्या हॉर्नचा कर्णकर्कश्‍श आवाज...हजारो-लाखोंची वर्दळ...धूळ आणि धुराचे प्रदुषण असा गोंगाट आज थांबल्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. सांगली परिसर आणि उपनगरातील रस्ते आणि चौकांनी आज मोकळा श्‍वास घेतला. लांबलचक दिसणारे रस्ते आणि बंदोबस्तासाठी चौकात थांबलेले पोलिस एवढीच काय ती वर्दळ दिसून आली. दुकानांचे "लॉक डाऊन', बंद घरे-बंगले आणि फ्लॅट असा शुकशुकाट सर्वत्र जाणवला. "कोरोना' मुळे हा अनोखा "जनता कर्फ्यू' नागरिकांनी प्रथमच अनुभवला. 

सांगली-सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची आणि नागरिकांची गर्दी...गाड्यांच्या हॉर्नचा कर्णकर्कश्‍श आवाज...हजारो-लाखोंची वर्दळ...धूळ आणि धुराचे प्रदुषण असा गोंगाट आज थांबल्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. सांगली परिसर आणि उपनगरातील रस्ते आणि चौकांनी आज मोकळा श्‍वास घेतला. लांबलचक दिसणारे रस्ते आणि बंदोबस्तासाठी चौकात थांबलेले पोलिस एवढीच काय ती वर्दळ दिसून आली. दुकानांचे "लॉक डाऊन', बंद घरे-बंगले आणि फ्लॅट असा शुकशुकाट सर्वत्र जाणवला. "कोरोना' मुळे हा अनोखा "जनता कर्फ्यू' नागरिकांनी प्रथमच अनुभवला. 

"कोरोना' विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असून देशातही शिरकाव केला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. "कोरोना' विषाणूचा प्रसार होणारी साखळी मोडीत काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी "जनता कर्फ्यू' घोषित केला होता. तो घोषित केल्यानंतर जनता कर्फ्यू म्हणजे काय? याची गेले दोन-तीन दिवस चर्चा रंगली होती. सोशल मिडियावरून या कर्फ्यूबाबत जागृती सुरू होती. तसेच प्रशासनाने देखील सर्वत्र फलक लावून कर्फ्यू ला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते. हा कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी करण्याबाबत जागरूक नागरिकांनी देखील सोशल मिडियावरून आवाहन केले होते. कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी सायंकाळीच अनेकांनी रविवारी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली. दूध, भाजीपाला, किराणा माल खरेदीसाठी शनिवारी गर्दी झाली होती. 

आज सकाळी कर्फ्यूचा दिवस उजाडल्यानंतर सकाळी सहापासून रस्त्यांवर थोडीफार गर्दी दिसली. फिरायला जाणाऱ्या अनेकांनी आज विश्रांती घेतली. जे कोणी रस्त्यावर होते त्यांची घराकडे जाण्याची गडबड दिसली. दूध विक्री केंद्र, बेकरी आणि किराणा दुकाने काही काळ उघडी होती. त्यानंतर कोणीही आवाहन न करता सकाळी सातपासून "शट डाऊन' झाल्याचे चित्र दिसले. शहरातील मुख्य पेठा, मोठे चौक यापासून अंतर्गत गल्ल्या, उपनगरे काही वेळातच सामसूम झाली. रस्त्यावर अपवादाने एखादा दुसरा मनुष्य सोडला तर शुकशुकाट जाणवला. 

चौक झाले निमर्नुष्य- 
बसस्थानक चौक, सिव्हील हॉस्पिटल चौक, गजबजलेला मारूती चौक, टिळक चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, कॉंग्रेस भवन, राम मंदिर, मार्केट यार्ड चौक, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग चौक, विजयनगर चौक येथील दुकानांनी शंभरटक्के "शट डाऊन' केले होते. उपनगरातील चौक सामसूम बनले होते. शहरातील महत्वाच्या चौकात बंदोबस्तासाठी पोलिस व वाहतूक पोलिस विश्रांतीसाठी बसून होते. कोणी चाललेला दिसला तर चौकशी करून पुढे सोडत होते. बऱ्याच वेळानंतर एखादी रिक्षा, रूग्णवाहिका किंवा पोलिसांची गाडी दिसत होती. कर्फ्यूच्या निमित्ताने शहरातील गजबजलेले चौक आणि रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. 

लांबलचक रस्ते- 
एरव्ही दिवसभराची गाड्यांची आणि माणसांची वर्दळ, दुकानांसमोरील गर्दी, पार्किंग केलेली वाहने यामुळे शहरातील भले मोठे रस्ते अरूंद वाटतात. परंतू आजच्या कर्फ्यूमुळे दूरवर रस्ते मोकळे दिसले. तसेच रस्त्यांची रूंदीही जाणवली. 2009 च्या कर्फ्यूनंतर अकरा वर्षानी आज प्रथमच जनता कर्फ्यूमुळे रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसले. बसेस, रिक्षा अशी कोणतीच वाहतूक सुरू नव्हती. त्यामुळे नेहमीचा गोंगाट आणि प्रदुषणापासून सांगलीकरांना सुटी मिळाली. 

घरे-बंगले, फ्लॅट बंद- 
जनता कर्फ्यूमुळे सकाळपासून सर्वांनी घरे, बंगले, फ्लॅटमध्ये स्वत:ला कोंडून घेतले होते. टिव्हीसमोर मालिका, चित्रपट बघण्यात सर्वजण गुंग असल्यामुळे नेहमीची वर्दळ दिसलीच नाही. रस्त्याकडेला असलेल्या बंगल्याच्या किंवा फ्लॅटच्या खिडकीतून डोकावून अनेकांनी कर्फ्यूचा अंदाज घेतला. काहींनी रस्त्यावर येऊन पाहणी केली. परंतू निर्मनुष्य रस्ते पाहून घराकडे जाणे पसंत केले. 
 

अत्यावश्‍यक सेवा सुरू- 
अत्यावश्‍यक सेवेमुळे शहरातील पेट्रोलपंप सुरू होते. परंतू पेट्रोलपंपावर बोटावर मोजण्याइतपत ग्राहकांचा अपवाद सोडला तर शांतताच होती. अनेक ठिकाणी दवाखाने, मेडिकल स्टोअर्स बंद होते. सिव्हील चौकात मेडिकल सुरू होते. बसेस पूर्ण बंद करण्यात आल्या होत्या. रिक्षा व वडापही पूर्ण बंदच होते. रूग्णवाहिका मात्र सज्ज होत्या. 
 

उत्साही मंडळींना प्रसाद- 
जनता कर्फ्यूचा अनुभव घेण्यासाठी राजरोसपणे रस्त्यावरून फिरणाऱ्या उत्साही मंडळींना मात्र पोलिसांच्या लाठीचा सौम्य प्रतिसाद मिळाला. पोलिसांची लाठी पाठीवर पडल्यामुळे अनेकांची पळता भुई थोडी झाली. सोशल मिडियावर या लाठीमाराचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यामुळे इतरांनी रस्त्यावर येण्याचे धाडस टाळले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silence due to "Janata curfew" in Sangli