घनकचऱ्यावर नुसतीच चर्चा; सांगलीत स्थायीची सभा तहकूब 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

घनकचरा प्रकल्पाची निविदा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गोपणीयरित्या रेटण्यात आली आहे. तिला मान्यतेचा विषय स्थायी समितीपुढे होता. या पाचशे कोटी रुपयांचा पापात कोण सहभागी होणार आणि कोण विरोध करणार, याकडे लक्ष लागले होते.

सांगली ः घनकचरा प्रकल्पाचे नेमके काय होणार, याकडे समस्त सांगलीकरांचे लक्ष लागलेली महापालिकेची स्थायी सभा तहकूब करण्यात आली आहे. या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर भाजपचे बहुमत असलेल्या स्थायी सदस्यांनी या विषयावर पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, असे ठरवले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. ही सभा ऑनलाईन झाली. 

घनकचरा प्रकल्पाची निविदा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गोपणीयरित्या रेटण्यात आली आहे. तिला मान्यतेचा विषय स्थायी समितीपुढे होता. या पाचशे कोटी रुपयांचा पापात कोण सहभागी होणार आणि कोण विरोध करणार, याकडे लक्ष लागले होते. भाजपने काल व्हीप जारी करत या विषयाला विरोध करण्याचे जाहीर केले होते. त्याचा गाजावाजाही करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या स्थायीत भाजपचे सदस्य या प्रकल्पाच्या निविदेवर तुटून पडतील आणि तो रद्द करतील, अशी चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली होती, त्यात काय दडले आहे, या पापात त्यातील कोण भागीदार आहे, याचा उलगडाही आजच होणे अपेक्षित होते. 

परंतू, ही सभाच तहकूब करून थोडा वेळ हाती ठेवण्याचे धोरण सदस्यांनी राबवल्याचे चित्र समोर आले आहे. या विषयावर सखोल चर्चा करूया, अजून काही मार्ग निघतोय का पाहूया, अशी भूमिका यावेळी चर्चेत ठेवण्यात आली. आता पुढील सभेआधी बैठका होतील, चर्चा झडतील, त्यानंतर भाजपची भूमिका तीच राहते का? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेमके काय करणार? ही डाळ शिजलीच पाहिजे म्हणजे "आचारी' काय शक्कल लढवणार, हा सारा खेळ पुन्हा रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simply discuss solid waste; Standing meeting in Sangli

Tags
टॉपिकस
Topic Tags: