सावधान, इथे आढळलेत आढळले डेंगीचे सहा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

कीकडे कोरोना या वैश्विक संकटाने सर्वत्र थैमान घातले असतानाच कडेगाव शहरात आता डेंगीचे सहा रुग्ण आढळले आहेत.

कडेगाव (जि. सांगली) : एकीकडे कोरोना या वैश्विक संकटाने सर्वत्र थैमान घातले असतानाच कडेगाव शहरात आता डेंगीचे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायत व आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 

कडेगाव हे तालुक्‍याचे ठिकाण असले तरी तालुक्‍यातील काही खेडेगावांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढ्या पायाभूत सोयीसुविधा केल्या गेल्या आहेत तेवढ्या सोयीसुविधा येथे नगरपंचायत होऊनसुद्धा येथील पदाधिकारी व अधिकारी यांना करता आलेल्या नाहीत. त्यामुळे शहरात विकासाचा मोठा बॅकलॉग निर्माण झाला आहे. याबाबत पदाधिकारी, अधिकारी व नेतेमंडळी यांना "ना खंत ना खेद' अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथे कोरोनाच्या साथीच्या अगोदर नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून नगरसेविकांचे "राजीनामानाट्य' रंगले होते. तर अंतर्गत धुसफुशीतून उपनगराध्यक्षांनीही आपला राजीनामा नेत्यांकडे सुपूर्द केला आहे. 

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात कोरोना महामारीतही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील बेकी जगजाहीर झाली. नगरसेवकांचेही विकासकामांच्या अंमलबजावणीत एकमत नसते. त्यामुळे येथे नगरपंचायत होऊनही शहर अजूनही विकासकामात कोसों दूरच राहिले आहे. याबाबत विरोधी पक्षाची भूमिकाही अलीकडे बघ्याचीच राहिली असल्याचे बोलले जात आहे. 

परिणामी शहरात वरचेवर विविध साथी "मुक्कामी' असतात. यापूर्वी येथे गॅस्ट्रोने बळी गेलेले आहेत. तर डेंगी, चिकनगुण्या आदी साथीचे रुग्ण येथे सतत आढळून येत असतात. नगरपंचायतीने स्वच्छतेचा ठेका 24 लाखांवरून थेट 74 लाखांचा दिला आहे. तरीही शहरात स्वच्छतेअभावी डासांची उत्पत्ती कशी होते आणि डेंगीची साथ कशी येते, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे. 

तेव्हा नगरपंचायत व आरोग्य विभागाने येथील डेंगीची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six dengue patients found in Kadegaon