बेळगाव : सहा जणांचा मृत्यू; ३९ जनावरे दगावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lightning

बेळगाव : सहा जणांचा मृत्यू; ३९ जनावरे दगावली

बेळगाव - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याबरोबरच जीवितहानीही झाली आहे. वळीव पावसाबरोबरच वीज कोसळून जिल्ह्यात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३९ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बेळगाव तालुक्यातील दोघे तर खानापूर, हुक्केरी, मुडलगी, रामदुर्ग तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात ३९ जनावरांचा मृत्यू झाला असून, ९५९ घरांची पडझड झाली आहे, तर ११ घरे पूर्णपणे कोसळली आहेत. त्यामुळे अनेकजण संकटात सापडले आहेत. पावसामुळे मुडलगी तालुक्यातील सुमारे २३६.८८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी, रामदुर्ग, अथणी, चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील ३६७.६६ हेक्टरमधील फळबागांचे नुकसान झाले आहे. संबंधितांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाहणी केली जात आहे.

अथणी आणि कागवाड तालुक्यातील द्राक्ष बागांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील द्राक्षे तोडून ते शेडमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये १,५०० टन द्राक्षांचे नुकसान झाले आहे. झाडांना असलेली द्राक्षेही खराब झाली आहेत. एकंदरीत वळीव पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जीवितहानी होण्यासह शेती आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना शासनाने योग्य ती नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

बेळगाव जिल्ह्यात सुमारे १,५०० टन द्राक्षांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

- महांतेश मुरगोड, उपसंचालक, फलोत्पादन खाते.