महाराष्ट्रातील 16 गावांत पेटले पाणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

औंधसह सोळा गावे बंद ठेऊन तसेच औंध येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी, युवकांनी मुंडन केले. पाटबंधारे विभागाच्या मनमानी व वेळकाढू कारभाराचा आंदाेलकांनी निषेध केला.

औंध (सातारा) : औंधसह सोळा गावांच्या शेती पाणी प्रश्नाबाबत सातारा पाटबंधारे विभाग व उरमोडी विभागातील अधिकारी दाखवत असलेली अनास्था तसेच त्यांच्या गलथान व वेळकाढू कारभाराचा निषेध करण्यासाठी आज (बुधवारी) औंध येथे मुंडन आंदोलन करून ,सोळा गावे बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. मागील सात वर्षापासून औंधसह जायगाव, अंभेरी, खबालवाडी, नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, करांडेवाडी,गणेशवाडी, खरशिंगे,पळशी, गोपूज, गोसाव्याची वाडी,कुमठे,वरूड या सोळा गावांचा शेती पाणी प्रश्नासाठी राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ग्रामस्थ, युवकांचा लढा सुरु आहे.

याबाबत दोन वेळा आंदोलने व मोर्चे काढल्यानंतर सातारा पाटबंधारे विभागाने डिसेंबर 2019 अखेर समयबध्द कार्यक्रम आखून सर्व बाबींची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र उरमोडी विभागाचे उपअभियंता एम.एस.धुळे यांच्या वेळकाढू व मनमानी कारभारामुळे सोळा गावांचा उरमोडी लाभक्षेत्रात समावेश करणे,निविदा काढणे व अन्य बाबी रखडल्याने औंधसह सोळा गावांचा शेती पाणी प्रश्न रखडला आहे.त्या पार्श्वभूमीवर बुधवारी औंधसह सोळा गावे बंद ठेऊन तसेच औंध येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी, युवकांनी मुंडन करून पाटबंधारे विभागाच्या मनमानी व वेळकाढू कारभाराचा निषेध केला. यावेळी "पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे" एम.एस.धुळेंना बडतर्फ करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

हेही वाचा - साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

दत्तात्रय जगदाळे म्हणाले, कोणतेही शासन आले ,बदलले तरी दुष्काळी औंध भागातील पाणी प्रश्नाकडे हे शासन गांभीर्याने पाहत नाही. सहा ते सात वर्षांपासून सोळा गावातील जनतेचा लढा सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन अधिकार्यांनी उरमोडीचे पाणी शेती देण्यासाठी समयबध्द कार्यक्रम आखून दिला होता. डिसेंबर 2019 अखेर सर्वेक्षण व अन्य बाबींची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र अधिकारी वर्गाच्या सुंदोपसुंदी मुळे हे काम रखडत चालले आहे. याबाबत आता जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर सातारा व पुणे येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर गनिमी काव्याने मोर्चा काढण्याचा व हल्लाबोल करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला तसेच संबंधित अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभाराची वरिष्ठांनी दखल घ्यावी व कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उपसरपंच दिपक नलवडे, रमेश जगदाळे,धनाजी आमले , दिपक कदम,तानाजी इंगळे,विठल चव्हाण, भरत यादव,प्रशांत जाधव,प्रशांत कुंभार, गणेश गायकवाड, लक्ष्मण घाडगे,जितेंद्र जामकर, राजेंद्र यादव
किसन आमले,अनिल माने,विष्णू जाधव,वसंत जानकर,दिलीपबुवा जाधव,मुराद मुल्ला ,नामदेव भोसले, संतोष शिंदे,सागर जगदाळे, साहेबराव पवार, गणेश देशमुख ,किसन तनपुरे,हणमंत माने, शैलेश मिठारी, संदिप गुरव,सचिन चव्हाण ,गणेश जानकर, विशाल ओतारी , शेतकरी, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या आंदोलनाला सर्व व्यापारी, विविध सामाजिक संघटना, आजी माजी सैनिक संघटना ,ग्रामस्थांनी पाठिंबा दिला .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteen Villages Were Closed Today For Water In Maharashtra