esakal | Video : ग्रेट; साठीतीही शोभाताई शिकल्या दुचाकी चालवायला
sakal

बोलून बातमी शोधा

Video : ग्रेट; साठीतीही शोभाताई शिकल्या दुचाकी चालवायला

रेवंडे ते आरे हा पाच किलोमीटरचा घाटरस्ता. हे सारे अंतर आजाेबा आजींबरोबर चालत पूर्ण करायचे. त्यातूनच दुचाकी शिकण्याचा हा अनोखा प्रवास पूर्णत्वाकडे पोचला.

Video : ग्रेट; साठीतीही शोभाताई शिकल्या दुचाकी चालवायला

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : कोणतीही गोष्ट शिकायला ना वयाचे बंधन लागते, ना वेळेकाळेचा अडसर. त्याचाच प्रत्यय देताना प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर दुर्गम भागातील साठीच्या उंबरठ्यावरच्या आजीबाई चक्क दुचाकी चालवायला शिकल्या आहेत. जिथे दुचाकी पाहायला मिळणे दुरापास्त तिथे आजींचे दुचाकीवर स्वार होणे साहजिकच कौतुकाचा विषय बनला आहे.
 
शोभा बळिराम भोसले हे या आजींचे नाव. त्या सातारा तालुक्‍यातील रेवंडे गावच्या रहिवासी. रेवंडे हे मुळातच तालुक्‍याच्या पश्‍चिम टोकावरचे गाव. डोंगरउंचावर असलेल्या या गावाला पूर्वी वाहतुकीची समस्या तीव्रतेने भेडसावत होती. पाच वर्षांपूर्वी गावासाठी घाटरस्ता तयार झाला. त्यामुळे ग्रामस्थांचे दळणवळण सुलभ व्हायला सुरुवात झाली. गावात एरवी दुचाकीचे दर्शन घडणे दुर्मिळ. रस्त्याच्या निर्मितीनंतर गावात हळूहळू दुचाक्‍या येऊ लागल्या. स्वाती ही शोभाआजींची कन्या. शिक्षणासाठी तिला दुचाकी घेण्यात आली. गेल्या वर्षी तिचा विवाह झाला. मग तिची दुचाकी बरेच दिवस तशीच पडून होती. प्रथम आजोबा ती चालवायला शिकले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आजींनीही मग दुचाकी शिकण्याचा निर्धार केला.

मुळात या वयात दुचाकी शिकणे म्हणजे शून्यातून सुरुवात. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आपला निश्‍चय पुरा केला. गुराढोरांची, शेतातली कामे आटोपली, की आजोबा दुचाकी बाहेर काढायचे. आजी त्यावर बसायच्या. आजोबा मागे आधारासाठी पकडणार. मग हळूहळू गाडी पुढे पुढे सरकत राहायची. हे गमतीदार चित्र घाटातील वाटेवर नित्याचे बनले. त्यातून शोभाआजी दुचाकी चालवायला शिकल्या आहेत.

हेही वाचा : नाना पाटेकरचे मल्हारने उलगडले अंतरंग

"माझ्या मालकांना मी गाडी शिकावी असे सतत वाटायचे. त्यांची इच्छा मी पुरी केली. याचे मला मोठे समाधान वाटते,' शोभाआजींची प्रतिक्रिया ही अशी. त्यांच्या या शिकण्याच्या प्रवासाला सर्वांकडून मोठी दाद मिळत आहे. त्यांचे कौतुक होत आहे. 

आजोबांची शिकस्त 

शोभाआजींना दुचाकी शिकविण्यासाठी आजोबांनी प्रयत्नाची मोठी शिकस्त केली. ते कायम दुचाकीच्या मागून चालत राहणार. रेवंडे ते आरे हा पाच किलोमीटरचा घाटरस्ता. हे सारे अंतर ते आजींबरोबर चालत पूर्ण करायचे. त्यातूनच दुचाकी शिकण्याचा हा अनोखा प्रवास पूर्णत्वाकडे पोचला.

loading image