esakal | नाना पाटेकरचे 'मल्हार'ने उलगडले अंतरंग
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पाटेकरचे 'मल्हार'ने उलगडले अंतरंग

आई-बाबा आणि आज्जीसह छत्रपती संभाजी महाराज यांचे माझ्या ह्दयातील स्थान खोलवर आणि अढळ आहे. चित्रपटात भूमिका करायची झाल्यास छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारण्याचे स्वप्न आहे. ही भूमिका माझ्यासाठी मोठी जबाबदारी असेल, त्यासाठी मला प्रथम माझी पात्रता बनवावी आणि तपासावीही लागेल.

नाना पाटेकरचे 'मल्हार'ने उलगडले अंतरंग

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा)  : 'वडील-नट-समाजसेवक यासह सर्वच अंगांनी 'बाबा' हे पल्याडचं व्यक्तीमत्व आहे. कुठलंही विशेषण त्यांना लागू होत नाही. टंगळमंगळ, गप्पा गोष्टी करत आणि लिंबू पाणी पित चढण्यासारखा हा डोंगर नाही. त्यांचा आवाका खूपच मोठा आहे, विशिष्ठ चौकटीत त्यांना बंदीस्त करणे चुकीचे ठरेल. कामाचा व्याप, धावपळीमुळे दररोज आमच्या वाट्याला ते किती येतात? याहीपेक्षा त्यांच्या प्रत्येक कार्याला हातभार लावणे म्हणजेच आमच्यासाठी सतत त्यांच्या सोबत राहण्यासारखे आहे.' चित्रपट,अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातला 'बापमाणूस'उलगडून सांगताना नाना पाटेकर यांचे पूत्र मल्हार भरभरून बोलत होते. 

'नाम'संस्थेच्या कामानिमित्त येथे दौऱ्यावर आलेल्या मल्हार यांच्यासमवेत घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथील शिवम प्रतिष्ठानच्या केंद्रात मारलेल्या गप्पांत त्यांनी पडद्यावर करारी व रागीट नाना पाटेकरांचे वडील म्हणनेचे पैलू उलघडले. यावेळी नामचे सचिव अभिनेते मकरंद अनासपुरे, पश्‍चिम महाराष्ट्राचे समन्वयक गणेश थोरात उपस्थित होते. 
 
ते म्हणाले,' हे एक खूप वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यात मोठी ऊर्जा सामावली आहे.अनेकांची छत्र सावली बनले असताना आम्ही बाबा-बाबा करणे चुकीचे आहे. ते कधी शांत, निवांत बसलेले पाहण्यात नाहीत. घरातही त्यांचे नेहमीच काही काम चालूच असते. त्यांची ऊर्जा, आयुष्य, काम खूप महत्वाचे आहे, ते कदापीही वाया जावू नये. त्यांच्या कार्यात मला संधी देणे, हे माझे नशीबच समजतो. त्यांचे नियम आणि त्यात जगणे हे आगंतुक येत नाही, त्याची सुरवात प्रथम त्यांच्या स्वतः पासून आणि घरातून झालेली असते. माझ्या सोबत काही चांगले आलेलं असेल, ते सर्व त्यांचं आणि काही वाईट आढळलं तर ते माझे एकट्याच असेल. बाबा कुठेही असले तरी आमच्यासाठी ते नेहमी सोबतच असल्यासारखे वाटतात. त्यांच्या कार्यात राहणे म्हणजेच त्यांच्या सोबत असल्यासारखे आहे.' 

हेही वाचा : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

अभिनय क्षेत्राबद्दल मल्हार यांनी वयाच्या चौथ्या वर्षी 'प्रहार' च्या चित्रीकरणावेळीचा प्रसंग सांगितला. त्या चित्रपटात रडणाऱ्या लहान मुलाचा प्रसंग चित्रित करायचा होता, त्यासाठी बाबांनी मला सेटवर नेले, पण रडायचे नाव काढत नसल्याने थोबाडून रडायला लावले. तेव्हापासून अभिनयापासून मी दूर पळालो. मला निर्मिती क्षेत्रात रस आहे. त्यात करण्यासारखे खूप काही आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजीत निर्मिती करणार आहे. आई-बाबा आणि आज्जीसह छत्रपती संभाजी महाराज यांचे माझ्या ह्दयातील स्थान खोलवर आणि अढळ आहे. चित्रपटात भूमिका करायची झाल्यास छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारण्याचे स्वप्न आहे. ही भूमिका माझ्यासाठी मोठी जबाबदारी असेल, त्यासाठी मला प्रथम माझी पात्रता बनवावी आणि तपासावीही लागेल.' 

'नाम' जगभर पोचवायचे आहे... 

मल्हार पाटेकर नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतात. 'नाम' बद्दल ते म्हणाले,'ही महत्वकांक्षा नव्हे तर गरज आहे. विशिष्ठ क्षेत्रापुरते नामचे कार्य मर्यादित न ठेवता प्रत्येक क्षेत्राला ते जोडले जावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. केवळ महाराष्ट्र आणि देशभरच नव्हे तर जगभर नाम पोहचवायचे आहे. नामच्या वाटचालीला पाच वर्षे झाली. कामानिमित्ताने तळापर्यंत जाणं होत असून नवनवीन गोष्टी शिकता येतात. खूप काही झालं असले तरी अजून खूप काही व्हायचंही आहे. आपण संपलो तरी, काम सुरूच राहीले पाहिजे. 'माझ्यासाठी तु वेगळा नाहीस तर त्यातलाच एक आहेस'असे माझ्या बाबांचे मला सांगणे आहे'.

वाचा : त्याला व्हायचे हाेते माेठा कीर्तनकार पण...

loading image