कोल्हापूरातील दीपक ठरला कडबा कुट्टीत माहीर .... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak

गोरखनाथ कुंभार यांनी पारंपरिक व्यवसायात न  रमता पत्र्याची मापाटी व चिपटी करण्यात हात खंडा मिळवला.

कोल्हापूरातील दीपक ठरला कडबा कुट्टीत माहीर ....

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्‍यातील गोरखनाथ कुंभार पारंपरिक व्यवसायात रमले नाहीत. गावात पन्नासभर कुंभार कुटुंबाची घरे. मातीला आकार देण्यात एकालाही इंटरेस्ट नव्हता. या वर्तुळात आजही बदल झालेला नाही. कुंभार काका अर्धा एकर शेतात घाम गाळायचे. गावातल्या इतर शेतकऱ्यांच्या शेतात भांगलणीतून पैसे मिळवायचे. पत्र्याची मापाटी व चिपटी करण्यातही त्यांचा हात तगडा राहिला. ऑर्डरप्रमाणे ती बनवून देण्यात ते कमी पडायचे नाहीत. मुलगा दीपक व अनिल यांच्या डोळ्यात वडिलांच्या हातातले कसब बसले. कमी पैशातले कडबा कुट्टी यंत्र बनवून त्यांनी गावकऱ्यांना सुखद धक्का दिला.    
 
गोरखनाथ कुंभार अर्थात कुंभार काकांचं आयुष्य कष्टाचं. वाट्याला एक एकर जमीन. गावातील कालव्यात अर्धा एकर गेली. पोटच्या दोन पोरांसाठी मुबलक पैशाची तजवीज आवश्‍यक होती. फडक्‍यात भाकरी बांधून इतरांच्या शेतात राबणं सुरू होतं. कष्टाला आजही पूर्णविराम मिळालेला नाही. त्यांच्या पत्नी शारदा यांचाही मार्ग कष्टाचाच राहिला. मुलगा दीपक व अनिल यांच्या शिक्षणात त्यांनी तडजोड केली नाही. शैक्षणिक साहित्यासाठी त्यांनी घरखर्चाला कात्री लावली. वाठारच्या मामांकडे दीपक शिक्षणासाठी होता.

हेही वाचा - सावधान !  थकबाकीसाठी हा टॉवर  होणार सील... -

पंचवीस वर्षे टिकणारा धान्याचा हौद

दहावीपर्यंत शिकल्यावर आयटीआयचा त्याने कोर्स केला. राजस्थानातल्या जयपूरमध्ये दोन वर्षे त्याने अंग मोडून काम केलं. खासगी कंपनीत दोन वर्षांची राबणूक झाली. केबीन बॉडी जोडण्याचं कामात त्याचा हात चालला. अनुभवाची शिदोरी घेऊन तो गावी परतला. त्या कामाला सोडचिठ्ठी दिल्यावर पुढच्या कामाचा त्याचा रस्ता ठरला होता. वडिलांच्या चिपट्या-मापट्या बनविण्याचं तंत्र मनात बसलं होत. पत्र्याला आकार देण्यातच त्याने हात आजमावला. तट्टयाची कणगीत धान्य साठवण्याची पूर्वंपार पद्धत. त्याला त्याने बदलाचे वारे दिले. किमान पंचवीस वर्षे टिकणारा धान्याचा हौद बनवला. शेतकऱ्याच्या उपयुक्ततेचं यंत्र करण्याचा विचार त्याच्या डोक्‍यात होता. कडबा कुट्टीच यंत्राचा आकडा डोळे फिरवणारा होता.

क्लिक करा -सांगलीचा दशरथ झाला लखपती... -

कमी पैशात बनवले यंत्र

दीपकने कमी खर्चातलं कडबा कुट्टीच यंत्र घरीच तयार केलं. अवघ्या अडीच हजारातला त्याचा हा चमत्कार. हाताने कडबा कुट्टीच्या यंत्राचा पंचक्रोशीत गाजावाजा झाला. शेतकऱ्याला परवडणारी किंमत ठेवण्याला त्याने पसंती दिली. उन्हाळ्यात त्याच्यातला कुंभार जागा होतो. छोट्या पाचशे, मोठ्या वीस गणेशमूर्ती त्याच्या हातातून आकार घेतात. मामाच्या गावी त्याचे धडे घेतल्याचा तो परिणाम. व्यवसायातल्या भरभराटीने तीन एकर जागेची त्याने जोड दिली आहे. आई-वडिल शेतातल्या छोट्या-छोट्या कामात आजही असतात. धाकटा भाऊ अनिल बी. एस्सी. ॲग्री. तोही भावाच्या व्यवसायाचा परिघ वाढवण्यासाठी झटतोय.
 

टॅग्स :Kolhapur