"या' महापालिकेत आता "जय मार्कंडेय'चा नारा 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पद्मशाली समाजाच्या पहिल्या महिला महापौर 
पद्मशाली समाजातील सातजणांना आतापर्यंत महापौरपदाची संधी मिळाली आहे. त्यात इरय्या बोल्ली (1969-70), राजाराम बुर्गुल (1972-73), सिद्राम आडम (1978-79), प्रा. पुरणचंद्र पुंजाल (1985-86), धर्माण्णा सादूल (1989-90), महेश कोठे (1994-95), जनार्दन कारमपुरी (1998-99). सौ. यन्नम पद्मशाली समाजातील आठव्या, तर पहिल्या महिला महापौर आहेत. 

सोलापूर ः सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची नियुक्ती झाली आणि महापालिकेतील बहुतांश सर्व महत्त्वाच्या पदावर पद्मशाली समाजतील व्यक्ती कार्यरत झाल्या. त्यामुळे महापालिकेत सध्या सर्वत्र "जय मार्कंडेय'चा नारा घुमू लागला आहे. 

हेही वाचा...   ठाकरे सरकारने अडविली कोट्यवधीची विकासकामे 

सत्ता बदलली तरी नेतृत्व पद्मशाली समाजाकडे 
महापालिकेच्या स्थापनेनंतर पुलोदचा अपवाद वगळता कॉंग्रेसची सत्ता होती. त्यावेळी वेगवेगळ्या समाजाचे पदाधिकारी असले तरी त्यांची सूत्रे दिवंगत नेते विष्णूपंत कोठे यांच्याकडेच होती. त्यामुळे एका अर्थाने पद्मशाली समाजाकडेच महापालिकेचे नेतृत्व होते. हे नेतृत्व इतके खंबीर होते की कॉंग्रेसच्या कोणत्या उमेदवारासमोर कोणत्या पक्षातील उमेदवार महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असावा याचा निर्णय ते घेत, असे आजही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ऐकण्यात येते. आज महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बदलला आहे, नेतृत्व मात्र पद्मशाली समाजाकडेच आहे. 
 

हेही वाचा...  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा असा आहे इतिहास
 

सभागृहनेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष 
महापौर सौ. यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेता महेश कोठे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी कुमुद अंकाराम आहेत. यापैकी श्री. करली सोडले तर उर्वरित तीन नातेवाईक आहेत. त्यामुळे पक्ष वेगवेगळे असले तरी सत्ता मात्र कोठे कुटुंबीयांभोवती आहे. सौ. यन्नम यांना महापौरपदाची संधी दिली तर विरोधी पक्षनेते श्री. कोठे आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडतील का, असा प्रश्‍न महापौर निवडणुकीपूर्वी उपस्थित केला जात होता. मात्र, पद्मशाली समाजातील व्यक्तीला महापौरपदाची संधी मिळावी यासाठी यन्नम यांना उमेदवारी मिळावी अशी समाजाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे. पक्षाचा प्रश्‍न येईल तेव्हा पक्षाच्या धोरणानुसारच माझी भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता प्रत्यक्ष महापालिकेच्या कामकाजात, तसेच महापालिका सभेच्या वेळी ते कशी भूमिका घेतात यावर सर्वकाही अवलंबून आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The slogan of" Jay Markandeya "now in this municipal corporation