आर. आर. आबांच्या लेकीला पुत्ररत्न ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

स्मिता आर. आर. पाटील हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. आर. आर. आबांच्या लेकीने राजकारणातही एककाळ गाजवला. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते. 

सांगली - महाराष्ट्राचे लाडके आबा, अर्थात आर. आर. पाटील यांच्या लेकीला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आबांची लेक, स्मिता आनंद थोरात हिने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आबांच्या अकाली निधनानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेले आबांचे घर खूप काळाने आनंदाने भारले आहे. कोल्हापूर येथील डॉ. पत्की हॉस्पिटलमध्ये स्मिता यांनी बाळाला जन्म दिला असून बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याची आनंदवार्ता त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. 

स्मिता आर. आर. पाटील हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. आर. आर. आबांच्या लेकीने राजकारणातही एककाळ गाजवला. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते. आबांच्या पश्‍चात त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने आपल्या गटाच्या भूमिका माध्यमांसमोर मांडल्या होत्या. त्यांच्या भाषणातील आक्रमकता, मुद्देसूदपणा नेहमीच चर्चेत राहिला. 1 मे 2018 रोजी त्यांचा विवाह पुणे येथील बांधकाम व्यावसायिक आनंद थोरात यांच्याशी झाला. आनंद हे ऑस्ट्रेलिया येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुण्यात बांधकाम व्यवसायात आहेत. 

आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण

आमच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. गेले काही दिवस आम्ही बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करत होतो. अखेर तो क्षण आला आणि आम्हाला अतिशय आनंद झाला. आज आबा असते तर त्यांना सर्वाधिक नातवाचे काैतुक वाटले असते.

- स्मिता व आनंद थोरात

हेही वाचा - ॲन्टीबायोटिक इंजेक्‍शनमुळे पाच विद्यार्थी अत्यवस्थ 

विवाहात पवार कुटुंबियांचा पुढाकार

आबांच्या पश्‍चात या कुटुंबाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा महत्वाची भूमिका राहिला आहे. स्मिता यांच्या विवाहाच्या नियोजनातही पवार कुटुंबियांचा पुढाकार होता. लग्नसोहळ्याच्या स्वागताला स्वतः अजितदादा, सुप्रियाताई उभ्या होत्या. स्मिता पाटील या आबांच्या वारस म्हणून पुढे येणार का, याबाबत त्या काळात खूप चर्चा होत्या. आबांच्या पश्‍चात पत्नी  श्रीमती सुमनताई पाटील यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढली, त्या आमदार झाल्या. पण, राजकारणातील छोट्या-मोठ्या गोष्टी, जनसंपर्कात स्मिता पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

हेही वाचा - VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा 

नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने आनंद

आता स्मिता यांचा छोटा भाऊ रोहित आर. आर. पाटील हा राजकारणात सक्रिय झाला आहे. रोहित हाच 2024 साली राष्ट्रवादीचा तासगाव व कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचा उमेदवार असेल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच केली आहे. आबांच्या पश्‍चात राजकारणात आपला गट आणि दबदबा कायम राखत आबा कुटुंबाने समर्थकांना जोडून ठेवले आहे. या कुटुंबात आज नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smita R R Patil Give Birth To Child In Kolhapur Patki Hospital