आता इथे होता, कुठे गेला, शोधा रे त्याला ; नागोबा चक्क गाडीच्या सीटखाली

शिवाजी चौगुले
Wednesday, 17 February 2021

गडी शिराळ्याचा असला आणि नागराजा नवा नसला तरी घाबरं पडणारच की ! तसंच झालं.

शिराळा (सांगली) : नागोबा आला... अरे आता इथे होता... कुठे गेला... शोधा रे त्याला... सारं वावरं पालथं घालतं. पण काही सापडेना... मग गेला कुठे? जरा डोकं खाजवलं अन्‌ लक्षात आलं, दुचाकीत तर जावून बसला नसेल? सुरु झाली शोधमोहिम आणि हाती लागलं तर धक्काच बसला. हा सारा प्रकार घडला तो शिराळा गावात. आता शिराळा आणि नाग हे समीकरणच आहे. ही नागभूमीच आहे. येथे नागराजांचा अधिवास सार्वत्रिक. इथली नागपंचमी जगात भारी.

आजचा प्रकार घडला येथील दिग्विजय शिंदे यांच्याबाबत. दिग्विजय शिंदे त्यांच्या दुचाकीवरून शेतात जात होते. त्यांना पायाजवळ नाग असलेला दिसला. गडी शिराळ्याचा असला आणि नागराजा नवा नसला तरी घाबरं पडणारच की ! तसंच झालं. दिग्विजय यांनी टणकन्‌ उडी मारली आणि वावरात पळाले. गाडी बाजूला सोडली. थोडा वेळ गेल्यावर धाडसाने पुढे गेले. गाडीच्या आजूबाजूला पाहिले असता नाग दिसला नाही. त्यांनी सहकारी श्रीराम नांगरे-पाटील, ऋषिकेश घोडे-पाटील, बंधू राजेंद्र शिंदे यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले.

हेही वाचा - मिरज पंचायत समितीत भाजपला घरचा आहेर ; दोन सदस्यांमुळे काँग्रेस उमेदवाराचा विजय -

सर्वांनी शेतात नागाचा शोध घेतला. नाग सापडला नाही. नाग चुकून गाडीत गेला काय? अशी शंका येऊन तपासून पाहिले. नाग सीटखाली असलेल्या पॅनेलमध्ये जाऊन बसल्याचे दिसले. सारे थबकले. त्याला इजा होऊ नये आणि तो कुणाला चावा घेऊ नये, याची दुहेरी काळजी घेत त्याला सुखरूप बाहेर काढण्याची धडपड करण्यात आली. तरुणांनी अथक प्रयत्नांनी नागाला बाहेर काढले. प्रहार संस्थेच्या श्रीराम नांगरे यांनी सुखरूप सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snake found in two wheeler one person farm in sangli