तर खासगी दूध धंद्यातील लोकांना बदडून काढू...यांनी दिला येथे इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

ढालगाव (सांगली)- कवठेमहांकाळ तालुक्‍यातील दूध उत्पादकांना जादा दर देवू नये अशी शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या खासगी दूध धंद्यातील लोकांना वेळप्रसंगी बदडून काढून वठणीवर आणू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी येथे दिला.

ढालगाव (सांगली)- कवठेमहांकाळ तालुक्‍यातील दूध उत्पादकांना जादा दर देवू नये अशी शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या खासगी दूध धंद्यातील लोकांना वेळप्रसंगी बदडून काढून वठणीवर आणू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी येथे दिला.

 
ढालगाव (ता.कवठेमहांकाळ) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हॅंटसन (चेन्नई) कंपनीने सध्या सर्वाधिक दूध दर देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. तर खासगी दूध संकलन करणाऱ्यांनी त्यांना विरोध केल्यामुळे वाद चिघळला आहे. या पार्श्‍वभूमीवर बैठक घेण्यात आली. तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले खाजगी दूध व्यायसायिक सध्या कमी दर देत आहेत. हॅंटसन कंपनीनेही कमी दर द्यावा अन्यथा या कंपनीला दूध संकलन करू देणार नाही, असे तालुक्‍यातील तेरा दूध व्यावसायिकांनी कंपनीला लेखी अर्जाद्वारे इशारा दिला होता. त्यामुळे तातडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठक आयोजित केली होती. 

जिल्हाध्यक्ष श्री. खराडे म्हणाले, ""माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानी संघटनेने मागील काळात दूध दरासाठी राज्यभर आंदोलन केले होते. पालघर येथे एकही कार्यकर्ता न घेता शेट्टी एकटे रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यावेळी पाच रुपये दरवाढ मिळाली. शेतकऱ्यांना दर कमी द्या म्हणून कोण धमकावत असेल तर त्यांना दूध उत्पादक शेतकरी तुडवून काढतील. अशा लोकांचे दूध धंद्यातील काळे धंदे उघड करू. कुणीही जास्त दर देईल त्यांचे स्वाभीमानी संघटना समर्थन करेल. सध्या दूध धंद्यात प्रचंड भ्रष्टाचार फोफावला आहे. पस्तीस टक्के दूध भेसळयुक्त असून याची चौकशी व्हायला पाहिजे.'' यावेळी सुबराव काबुगडे, चुडेखिंडीचे विजयराव शितोळे व वैभव शेटे यांनी उत्पादकांच्या वतीने समस्या मांडल्या. स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सुरेश घागरे, मिरज तालुकाध्यक्ष भारत चौगुले, कवठेमहांकाळचे युवा अध्यक्ष सुरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वाघमारे, पांडुरंग यमगर, अंकुश घागरे, किसन घागरे, दत्ता भुसनर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So let's get rid of the people in the private milk business