कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी राहुरीत सोशल डिस्टन्स

विलास कुलकर्णी
गुरुवार, 26 मार्च 2020

किराणा दुकानासमोर गर्दी कमी होऊन, 'सोशल डिस्टन्स' तयार झाल्याने कोरूना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती दूर झाली. दुकानातील गर्दी कमी झाल्याने ग्राहकांना जलद सेवा मिळू लागली.

राहुरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'सोशल डिस्टन्स' प्रभावी उपाय ठरत आहे. राहुरी पालिकेतर्फे शहरातील किराणा दुकानांत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण व 'सोशल डिस्टन्स' ठेवण्यासाठी नामी शक्कल शोधली आहे. शहरातील प्रत्येक किराणा दुकानासमोर एक मीटर अंतरावर चौकोन आखून, ग्राहकांना त्या चौकोनात उभे करून, रांगेत किराणामाल दिला जात आहे. 

नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 'मी राहुरीकर' या फेसबुक पेजवरील सामाजिक कार्यकर्ते निलेश पांडे यांनी पाठविलेले एक छायाचित्र पाहिले. त्यात, 'सोशल डिस्टन्स' ची शक्कल होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाय योजना प्रभावी ठरणारी आहे. हे ओळखून मंत्री तनपुरे यांनी राहुरी पालिकेच्या प्रशासनास तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.

आज (बुधवारी) सकाळी पालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक किराणा दुकानासमोर एक मीटर अंतरावर पांढऱ्या रांगोळीचे चौकोन आखले. चौकोनात ग्राहकांना उभे करून, रांगेतच किराणा द्यावा. ग्राहकाच्या हातावर सॅनीटायझर द्यावे. ग्राहकांना एक मीटर अंतरावर बसवावे.  त्यांच्याकडून किराणा सामानाची यादी घ्यावी. यादीप्रमाणे सामान भरून, बिल घ्यावे. अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या.

किराणा दुकानासमोर गर्दी कमी होऊन, 'सोशल डिस्टन्स' तयार झाल्याने कोरूना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती दूर झाली. दुकानातील गर्दी कमी झाल्याने ग्राहकांना जलद सेवा मिळू लागली. नागरिकांना रांगेत, एकमेकांपासून एक मीटर अंतरावर उभे राहण्याची शिस्त लागली. ही उपयोजना राहुरी शहरात प्रभावी ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Distance in Rahuri to prevent Corona outbreak