घ्या जाणून सोलापूरच्या गुन्हे विश्वातील घडामोडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

मारहाण करून फायनान्सच्या कार्यालयातून नेली रोकड 

सोलापूर : अशोक चौकातील जाधव फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून दमदाटी करून 21 हजार 600 रुपये हिसकावून नेले. ही घटना 5 जानेवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

मारहाण करून फायनान्सच्या कार्यालयातून नेली रोकड 

सोलापूर : अशोक चौकातील जाधव फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून दमदाटी करून 21 हजार 600 रुपये हिसकावून नेले. ही घटना 5 जानेवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

नितीन सुरेश मुदगल (वय 28, रा. कैकाडी गल्ली, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर), सचिन युवराज धोत्रे (वय 27, रा. पाथरूट चौक, मुदगल बगीचा समोर, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. काकासाहेब अंबादास जाधव (वय 29, रा. विद्यानगर, उत्तर सदर बझार, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काकासाहेब जाधव आणि त्यांचे सहकारी रोहन गायकवाड हे दोघे त्यांच्या ऑफिसमध्ये दिवसभर जमा झालेले पैसे मोजत बसले होते. त्या वेळी नितीन मुदगल आणि त्यांचा सहकारी सचिन धोत्रे हे दोघे जाधव यांच्या कार्यालयात आले. तू इथे धंदा कसा करतोस ते बघतो... असे म्हणून नितीन आणि सचिन या दोघांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. मोजत असलेले 21 हजार 600 रुपये जबरदस्तीने हिसकावले. निघून जाताना ऑफिसच्या शटरवर आणि कारवर दगड मारून चार हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

सोशल यंत्रमाग संस्थेकडून फसवणूक 
दि सोशल अल्पसंख्याक यंत्रमाग औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेत सभासद करून घेऊन 11 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या सचिव, संचालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाहित नदाफ (वय 55), मेहबूब राजसाहेब शेख, फरदीन जुबेर शेख, बशीर अ. करीम शेख, महिरुन्निसा अकबर जमादार अशी आरोपींची नावे आहेत. 
अशपाक मुस्ताक चौधरी (वय 45, रा. जवाहरनगर, शेळगी, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 21 मे 2017 रोजी शास्त्रीनगर येथील पीरसाहब नदाफ हॉल या ठिकाणी घडली आहे. यात आरोपी आरोपी बशीर शेख हा फिर्यादी चौधरी यांचा मामा आहे. संस्थेचा सेक्रेटरी बशीर शेख याने संस्था सुरू करतेवेळी संस्थेचा सभासद झाल्यास यंत्रमाग कारखान्यासाठी जमीन व मशिनरी मिळणार आहे, असे सांगून सभासद करून घेतले. चौधरी यांनी 10 हजार रुपये संस्थेच्या कार्यालयात भरले. त्याची कोणतीही पावती मिळाली नाही. सभासदांच्या भांडवलातून संस्थेच्या नावाने हैदराबाद रस्त्यावर दोन एकर जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर जमिनीची विक्रीही करण्यात आली, विक्री केलेल्या जमिनीचे पैसे विद्यमान सभासदांना समान वाटून संस्था बंद करण्यात येणार आहे. या संस्थेचे खाते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य शाखेत आहे. संस्थेचे सभासद झाल्यापासून संचालक मंडळाने कधीही सभा बोलावली नाही. 21 मे 2017 रोजी परवानगी नसतानाही सभा घेतली. त्याठिकाणी चौधरी यांच्या सभासदाचा राजीनामा तयार करून घेतला. चौधरी यांचे शेअरची रक्कम, बचत फंड, उत्पादन खात्यावरील बाकी असे एकूण 11 हजार रुपये आरोपी फरदीन शेख याच्या खात्यावर पाठविले. अशाप्रकारे आरोपींनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur crime news