सोलापूर राष्ट्रवादीत नेते आहेत, नेतृत्व नाही 

ncp logo
ncp logo

सोलापूर : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते आहेत परंतु सर्वांना धाडसाने सोबत घेऊन जाणारा नेता नाही. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीने तसे नेतृत्व करण्याची संधी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व दिलीप सोपल यांना दिली. या दोघांच्याही नेतृत्वाच्या आणि स्वभावाच्या मर्यादा होत्या. जिल्ह्यात ताकदीचे नेते असूनही पक्षाने संधी न दिल्यामुळे मोहिते-पाटील यांच्यानंतर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीला नेताच मिळाला नाही. जिल्हा पातळीवरील निवडणुका लढविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणारा, धाडस दाखविणारा आणि वेळप्रसंगी खर्चही करणाऱ्या नेतृत्वाची आज सोलापूर राष्ट्रवादीला उणीव आहे. 
हेही वाचा : या निवडणूकीच्या मतपत्रिकेवर आता मालक...दादा...काका...भय्या 
जिल्ह्यातील राष्ट्रवादीकडे ताकद आहे परंतु आत्मविश्‍वास आणि धाडसाची कमतरता असल्याने आपण हरतोच अशी भावना आता रूढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रश्‍न मार्गी न निघाल्यास नव्या वर्षात सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक या दोन महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुकांचा निकालही असाच लागण्याची शक्‍यता आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोन्ही देशमुखांपैकी भाजपने जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी शांत व संयमी आमदार विजयकुमार देशमुख यांची निवड केली आहे. उमेदवार निवडीपासून ते आर्थिक पाठबळापर्यंतची सर्व ताकद भाजपने त्यांना दिली आहे. त्याचा परिणाम लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि नुकतीच झालेली महापौर निवड असो की जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी व निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. 
हेही वाचा : झेडपी अध्यक्षपदामुळे मोहितेंचे समाधान 
सहाव्यांदा आमदार झालेले बबनदादा शिंदे, आमदारकीची हॅटट्रिक करणारे आमदार भारत भालके, मतदार संघ राखीव होऊनही सहावेळा मोहोळ ताब्यात ठेवणारे माजी आमदार राजन पाटील, पहिल्यांदा आमदार झालेले परंतु जिल्ह्याच्या राजकारणातील खडान्‌ खडा माहिती असलेले संजयमामा शिंदे असे तीन पर्याय जिल्ह्याच्या नेतेपदासाठी राष्ट्रवादीकडे आहेत. पदाधिकारी ठरविण्याचा निर्णय भाजप सोलापूर जिल्ह्यात घेत होता तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आजही जुन्या पद्धतीप्रमाणे लखोट्याची वाट बघत बसली होती. राष्ट्रवादी वाट बघेपर्यंत भाजपने जल्लोषाचीही तयारी सुरू केली होती. जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाचे संदर्भ राष्ट्रवादीच्या राज्याच्या नेत्यांना आता तरी समजले असावेत. एकमेव आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न मिळाल्याने कॉंग्रेस अस्वस्थ आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीला नेता नाही. जिल्ह्यातील शिवसेना डॉ. तानाजी सावंत समर्थक व विरोधक अशा दोन गटात विभागली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची दयनीय अवस्था झाली असताना भाजपने मात्र जिल्ह्याला सक्षम पर्याय दिला आहे. 
हेही वाचा : भक्त निवास : क्षमता 90 जणांची, बुकिंग 60 जणांचे 
पराभवाची नुसतीच झाली चर्चा 
राष्ट्रवादी आणि पराभव हे समीकरण आता तयार झाले आहे. जिल्हा परिषद सभापती निवडीत बाबाराजे देशमुखांचा पराभव, विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा पराभव, 2017 च्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीला उमेदवार न मिळणे, माढा लोकसभा निवडणुकीत पराभव, 2019 च्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत पुन्हा पराभव अशा महत्त्वाच्या निवडणुकीत पराभवाची मालिकाच राष्ट्रवादीच्या मागे लागली आहे. या पराभवाची फक्त चर्चाच झाली. पराभवाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने "यहा सबकुछ चलता है' अशीच मानसिकता तयार होऊ लागली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com