शाळेच्या दाखल्यावरील प्रतिस्वाक्षरी आता बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

शिक्षण विभागाचा निर्णय; "युडायस' ग्राह्य धरणार

शिक्षण विभागाचा निर्णय; "युडायस' ग्राह्य धरणार
सोलापूर - शालेय विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून किंवा राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यातील शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिस्वाक्षरी घ्यावी लागत असे. मात्र, यापुढे अशाप्रकारची प्रतिस्वाक्षरी न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे पालकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात शाळा शिकण्यासाठी जाताना ज्या शाळेतून दाखला दिला आहे. त्या शाळेच्या दाखल्यावर प्राथमिक किंवा माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रतिस्वाक्षरी घ्यावी लागत होती. शाळा अधिकृत आहे की नाही, हे ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जात होती. मात्र, आता नव्या धोरणानुसार शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळा मान्यता क्रमांक व "युडायस' क्रमांकांचा उल्लेख करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे एखादी शाळा अनधिकृत आहे की नाही, हा विषय निकाली निघाला आहे. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला मुख्याध्यापकांनी प्रमाणित केला असल्यामुळे अशा दाखल्यावर प्रतिस्वाक्षरीची गरज नाही. हे लक्षात घेऊन सरकारने शाळेच्या दाखल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिस्वाक्षरी घेण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेचा दाखला घेऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकाला शिक्षणाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. "युडायस'च्या माध्यमातून राज्यात किती शाळा आहेत, त्या शाळांमध्ये किती विद्यार्थी, शिक्षक आहेत याची संपूर्ण माहिती मिळते.

Web Title: solapur news other signature school certificate is now closed