#Solapur दिड्डम.. दिड्डम.. सत्यम सत्यम...! 

परशुराम कोकणे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

दहा मिनिटे चालला अक्षता सोहळा
पूजा करून परत आल्यानंतर हिरेहब्बूंनी यात्रेची थोडक्‍यात माहिती सांगितली. सुहास शेटे यांनी समंती वाचन केले. सत्यम....सत्यम....' उच्चारताच अक्षतांसाठी लाखो भाविकांचे हात उंचावले. जवळपास 10 मिनिटे अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम चालला. एकाच वेळी लाखो हातांनी पडणाऱ्या अक्षतांचा हा सोहळा डोळे दिपवणारा ठरला. 

सोलापूर : रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा... तालात वाजणारा सनई चौघडा... ना पत्रिका... ना कोणाचं बोलावणं... तरीही उत्साहाने जमलेली लाखोंची गर्दी... सर्वांच्याच मुखात ओम सिद्धरामाय.. हा जप.. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या मानकऱ्यांची लगबग... एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष... दुपारी पावणे एक वाजता सत्यम सत्यम... दिड्डम... दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला... हे चित्र आहे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी मंगळवारी लागलेल्या विवाह सोहळ्याचे. 

हेही पहा - श्री सिद्धेश्वर यात्रा छायाचित्रांतून 

भाविकांनी केले नमन 
नंदीध्वजांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आनंदाने खुलले. पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर डोळे मिटून हात जोडून सर्वांनी नमन केले. पारंपरिक वाद्यांसह नाशिक ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविकांची लाट संमती कट्ट्याच्या दिशेने येत होती. डौलाने संमती कट्ट्याकडे येणाऱ्या नंदीध्वजांना स्मार्ट फोनमधील कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी भाविकांची धडपड सुरू होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्ग बंद केला होता. दोन वर्षांच्या चिमुकलीपासून 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांच्या मुखातील एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. नंदीध्वजांच्या आगमनानंतर हिरेहब्बू सिद्धेश्‍वर महाराजांच्या पूजेसाठी मंदिरात गेले. सकाळपासूनच माईकचा ताबा घेतलेल्या वेदमुर्ती बसवराज शास्त्रींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतून खुमासदार शैलीत निवेदन करून सर्वांनाच खिळवून ठेवले होते. तोवर संमती कट्ट्यावर विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. 

हे वाचा आणि पहा - येळय़्या सिद्धरामा... येळय्या सिद्धरामा 

या मान्यवरांची होती उपस्थिती 
अक्षता सोहळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम, खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सौ. दीपाली भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, यात्रेचे समन्वयक तथा प्रांत अधिकारी हेमंत निकम, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे,माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्‍वस्त ऍड. मिलिंद थोबडे यांच्यासह राजकीय नेत्यांची आवर्जून उपस्थिती होती. 

हेही वाचा - मकर संक्रातीनिमित्त खरेदीसाठी गर्दी 
क्षणचित्रे ः 
- दुपारी पावणे एक वाजता अक्षता सोहळा 
- राजकीय मान्यवरांची उपस्थिती 
- भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 
- गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठेवली चोरट्यांवर नजर 
- लाखोंच्या गर्दीवर दहशतवाद विरोधी पथकाचे लक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Shri Siddheshwar Yatra; Akshata Ceremony start