मकर संक्रांतीसाठी टिकल्यापासून पाटल्यापर्यंत खरेदीस झुंबड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

मकर संक्रांती निमित्त वाण लुटण्यात येते. हा सण साजरा करण्यासाठी सातारामधील राजवाडा परिसरात सुगड्यांची खरेदी हाेत आहे. संक्रांतवाण लुटण्यासाठी लागणाऱ्या भेटवस्तू महिला माेठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. 

सातारा ः संक्रांत सणासाठी लागणाऱ्या भेटवस्तू, तसेच सुगड्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत वर्दळ वाढल्याने मोती चौक, खणाळी, राजवाडा परिसर गर्दीने भरून जाऊ लागला आहे. संक्रांतीमुळे तिळाच्या वड्या करण्यासाठी चिक्की गुळाला मागणी वाढली आहे.

सुगड्यांबरोबरच बाजारपेठेत तिळाच्या वड्या, लाडू, तिळाची चिक्की असे सारे काही विक्रेत्यांनी उपलब्ध केले आहे. बाजारात मातीच्या सुगड्या विक्रीसाठी कुंभारांनी मांडल्या आहेत. आकाराप्रमाणे त्याचे दर ठरले आहेत. पारंपरिक साध्या खापरी सुगड्या आहेतच. त्याचबरोबर कलाकारांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सुगड्याही विक्रीस आणल्या आहेत. या सुगड्याही विविध रंगांतील नक्षीने सजल्याने साहजिकच महिलांचा ओढा या सुगड्या खरेदीकडे जास्त आहे. साध्या सुगड्यांचा खण 20 ते 25 रुपयांना, तर रंगीत सुगड्या 30 रुपयांच्या पुढे विकल्या जात आहेत.

अरे बापरे - पाचगणीच्या दरीतून असा काढला मुंबईच्या महिलेचा मृतदेह

मकरसंक्रांतीच्या तिळगुळासाठी लागणारा चिक्की गूळ, काळे व पांढरे तिळही बहुतेक सर्व दुकानांत आहेत. चिक्की गुळाचा पाक चांगला होतो आणि त्यामुळे वड्या, लाडूही चांगले होतात. त्यामुळे महिला त्यास प्राधान्य देतात. येथील बहुतेक मिठाई दुकानांत हलवा, तिळगुळाच्या वड्या, लाडू, चिक्की तयार केली आहे. अनेकांनी दुकानांपुढे स्टॉलही मांडले आहेत. त्याचे दर 80 रुपये किलोपासून पुढे आहेत.

हेही वाचा - दुष्‍काळात येथे पिकंतय पाणी

संक्रांतीला लुटण्यासाठी लागणाऱ्या भेटवस्तूही यात छोटे डबे, निरंजने, चमचे, रूमाल, वाट्या, डिश, कंगवे, बांगड्या विक्रेत्यांनी आता फुटपाथवर दुकाने थाटली आहेत. त्याचे दर 25 ते शंभर रुपये डझनापासून पुढे आहेत. मकरसंक्रांतीच्या खरेदीबरोबरच नवीन बांगड्यांची, सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने खणआळी भरून जात आहे. 

 

बांगड्यात व्हरायटी वाढली 

महिलांसाठीच्या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूची विक्री खणआळीत जोरात सुरू आहे. संक्रांतीसाठी बांगड्यांना फारच महत्त्व असते. सुवासिनी संक्रांतीस आवर्जून नव्या बांगड्या खरेदी करतात. त्यामुळे काचेच्या, लाखेच्या, प्लॅस्टिकच्या, मिनाकाम केलेल्या, अमेरिकन डायमंड लावलेल्या अशा विविध प्रकारच्या कर्नाटकी, अजमेरी बांगड्या हातगाड्यावर खणआळीत विकल्या जात आहेत. त्या खरेदीसाठी महिलांची झुंबड उडत आहे.

नक्की वाचा - शिवरायांशी तुलना झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले हाेते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Market Is Ready To Celebreate Makarsankranti Festival