सोलापूर झेडपी : उद्या एक वाजता सुनावणी, दोन वाजता सभापती निवडी 

प्रमोद बोडके
सोमवार, 13 जानेवारी 2020

वादग्रस्त मुद्यांव सुनावणी 
आजच्या सुनावणीतून वादग्रस्त मुद्दे वगळावे अशी मागणी बंडखोर सदस्यांच्या वकिलांनी केली होती. ही मागणी मान्य झाली. उद्याच्या (मंगळवार) सुनावणीत वादग्रस्त मुद्यांवर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने बजावलेला व्हिप, व्हिपचे ठिकाण, व्हिप देण्याची पध्दती, व्हिप देण्याचा अधिकार यासह वादग्रस्त मुद्यांवर उद्या (मंगळवारी) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. 

सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी करणाऱ्या माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे काय होणार? याबाबत निर्माण झालेली उत्सुकता आजही कायम आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची आज तब्बल साडेचार तास सुनावणी घेतली. उद्या (मंगळवार) दुपारी एक वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार असून दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी होणार आहेत. उद्या माळशिरसच्या सदस्यांबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय देतात? यावर सभापतीच्या निवडीचे राजकारण अवलंबून आहे. 

aschim-maharashtra/author-jai-goyal-symbolic-statue-combustion-kolhapur-marthi-news-251878">हेही वाचा - रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापुरात शिवप्रेमी भडकले 
राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते-पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, गणेश पाटील आणि अरुण तोडकर या सहा सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान केले आहे. या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते बळिराम साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर आज सुनावणी झाली. बंडखोर सदस्यांच्यावतीने ऍड. दत्तात्रेय घोडके, नितीन खराडे आणि सचिन भांजी यांनी काम पाहिले. गटनेते साठे यांनी दाखल केलेला अर्ज तांत्रिक बाबीवर नामंजूर करावा अशी मागणी बंडखोर सदस्यांच्या वकिलांनी केली. ही मागणी फेटाळल्यानंतर या मागणीच्या विरोधात न्यायालयात जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली. ही मागणी देखील जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी फेटाळली आहे. 
हेही वाचा - अखेर भाजपचे कारभारी ठरले 
म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी बंडखोर सदस्यांच्यावतीने वकिलांनी केली. ही मागणी देखील जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी फेटाळली आहे. आजच्या सुनावणीतून वादग्रस्त मुद्दे वगळावे ही देखील मागणी बंडखोर सदस्यांच्या वकिलांनी केली असून ही मागणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मान्य केली आहे. आजच्या सुनावणीत वादग्रस्त मुद्यांवर चर्चा झाली नाही. उद्याच्या (मंगळवार) सुनावणीत वादग्रस्त मुद्यांवर सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीच्यावतीने ऍड. इंद्रजित पाटील, ऍड. बाबासाहेब जाधव, ऍड. प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. बंडखोर सदस्या शितलादेवी मोहिते-पाटील म्हणाल्या, राष्ट्रवादीने आम्हाला निलंबित केल्याने आता आम्ही कोणालाही मतदान करण्यासाठी स्वतंत्र झालो आहोत. आजच्या सुनावणीमध्ये आम्ही आमची बाजू मांडली असून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. गटनेते बळिराम साठे म्हणाले, आजच्या सुनावणीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व पुराव्यांची पडताळणी केली आहे. उद्या पुन्हा होणाऱ्या सुनावणीत आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्‍वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur ZP One o'clock hearing tomorrow 2 pm commitee election