
जिल्हा बॅंकेची ‘ओटीएस’मधून थकबाकीदारांना ११० कोटींची सूट! एप्रिलनंतर वाढीव पीककर्ज
सोलापूर : जिल्हा मध्यवती बॅंकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरु केली आहे. त्याअंतर्गत २८ हजार शेतकऱ्यांना व्याज व दंडात जवळपास ११० कोटींची सवलत मिळणार आहे. ३१ मार्चपर्यंतच ही योजना असणार आहे.
सोलापूर : जिल्हा मध्यवती बॅंकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरु केली आहे. त्याअंतर्गत २८ हजार शेतकऱ्यांना व्याज व दंडात जवळपास ११० कोटींची सवलत मिळणार आहे. ३१ मार्चपर्यंतच ही योजना असणार आहे. आतापर्यंत एक हजार १७९ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत २७ कोटी रुपयांची थकबाकी भरली असून बॅंकेने त्यांना दंड-व्याजात पाच कोटी ८० लाखांची सवलत दिली आहे.
बॅंकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांकडील अल्प मुदतीचे कर्ज वसूल होऊन त्यांचा सातबारा कोरा व्हावा म्हणून एकरकमी परतफेड योजना सुरु करण्यात आली आहे. अल्प मुदतीचे कर्ज बॅंक शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने देते.
तर मध्यम मुदतीच्या कर्जाचा व्याजदर १३.५० टक्के आहे. ३० जून २०२० पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा यायोजनेचा लाभ दिला जात आहे. शेतकऱ्यांकडे या काळात कितीही थकबाकी झाली असल्यास त्यांना नऊ टक्के व्याजदर आकारून कर्ज वसूल केले जात आहे. तर दिर्घ मुदतीचे कर्ज जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना १४.७५ टक्क्यांनी देते.
थक पुनर्रचना कर्जाचा दर १४.५० टक्के असून रुपांतरीत कर्जाचा व्याजदर दहा टक्के आहे. या प्रकारातील शेतकऱ्यांना मुद्दलावरील रकमेला नऊ टक्क्यांनी व्याज आकारण्यात आले आहे. २८ हजार शेतकऱ्यांकडे जवळपास पाचशे कोटींची थकबाकी असून बॅंकेने त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ११० कोटींची सूट (दंड व्याज, सरचार्ज, नोटीस फी) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना पीक व क्षेत्र पाहून पुन्हा तेवढेच कर्ज दिले जात आहे.
एप्रिलनंतर मिळणार १० टक्के वाढीव कर्ज
सध्या जिल्हा बॅंकेकडून ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष अशा विविध पिकांसाठी हेक्टरी एक लाख १० हजारांपर्यंत तर कांद्याला एकरी २३ हजारांचे पीककर्ज दिले जात आहे. पण, एप्रिलनंतर तथा नवीन आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक कर्जात दहा टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. बॅंकेने त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीला पाठवला आहे. त्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती बॅंकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव यांनी दिली.