व्वा रे पठ्ठ्या, भाड्याची रिक्षा चालवताना मालक होण्यासाठी चोरल्या २४ लाखांच्या १५ रिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा
व्वा रे पठ्ठ्या, भाड्याची रिक्षा चालवताना मालक होण्यासाठी चोरल्या २४ लाखांच्या १५ रिक्षा

व्वा रे पठ्ठ्या, भाड्याची रिक्षा चालवताना मालक होण्यासाठी चोरल्या २४ लाखांच्या १५ रिक्षा

सोलापूर : कुंभारी परिसरातील गोदुताई परुळेकर विडी घरकुल येथील सैफ इरफान यादगीर याने प्रवासी वाहतुकीसाठी एक रिक्षा भाड्याने घेतली. त्याचा मित्र बिलाल सलीम गदवाल हा देखील ती रिक्षा चालवायचा. पण, स्वत:ची रिक्षा असावी म्हणून त्या दोघांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १५ रिक्षा चोरल्या. एमआयडीसी पोलिसांनी २३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या रिक्षा जप्त केल्या आहेत.

शहरातून दुचाकीबरोबरच रिक्षांची चोरीदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या परिसरातून चोरीला गेलेल्या रिक्षांचा शोध घ्यायला सुरवात केली. पोलिस नाईक चेतन रूपनर व सचिन भांगे यांना रिक्षा चोरणाऱ्यांबद्दल खबऱ्यांकडून माहिती मिळाली. पोलिस रेकॉर्डमध्ये संशयितांचा शोध घेतला, पण त्यांची चोरीची कोणतीच पार्श्वभूमी पोलिसांच्या हाती लागली नाही. तरीपण, पोलिसांनी सैफ व बिलाल या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शहर व ग्रामीणमधून चोरलेल्या रिक्षा कर्नाटकात विक्री केल्याचे सांगितले. काही रिक्षा त्या दोघांनी घराजळील महापालिका शाळा परिसरातील काटेरी झुडपात लपवून ठेवल्याचेही तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सैफ व बिलाल यांनी चोरलेल्या तब्बल १५ रिक्षा जप्त केल्या. ही कामगिरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी, पोलिस हवालदार राकेश पाटील, पोलिस नाईक भांगे, रूपनर, मंगेश गायकवाड, अमोल यादव, अश्रुभान दुधाळ, शंकर याळगी, काशिनाथ वाघे, शैलेश स्वामी, सचिन जाधव, मोहसीन शेख, इकरार जमादार, बागलकोट व नवनाथ लोहार यांच्या पथकाने केली.

  • जाताना जायचे एका रिक्षातून

  • अन्‌ येताना दोघांकडे दोन रिक्षा

बिलाल व सैफ हे गोदुताई परुळेकर वसाहतीत राहतात. दोघांची घरे जवळजवळ आहेत. सैफने भाड्याने रिक्षा घेतली होती. त्यातून चांगली कमाई होत असल्याने त्याने रिक्षाचा मालक होण्याचे ठरवले. बिलालने त्याला साथ दिली. त्यांनी एमआयडीसी, जोडभावी पेठ, जेलरोड, वळसंग, बार्शी, मंद्रूप येथून १५ रिक्षा चोरल्या. दोघेही रिक्षा चोरीसाठी भाड्याच्या रिक्षातून (एमएच १३, सीटी ०७०८) एकत्र जायचे आणि येताना बिलाल चोरीची रिक्षा घेऊन यायचा. चार-पाच महिन्यांतच त्यांनी १५ रिक्षा चोरल्या होत्या. त्यांनी मालक होण्याच्या आमिषातून पहिल्यांदाच रिक्षा चोरल्या आणि दोघांनी रिक्षा विक्रीचा प्लॅन आखला. पण, एमआयडीसी पोलिसांमुळे तो फसला.