अबब...! १,५२६ विवाहितांची पतीविरुद्ध पोलिसांत धाव; ‘भरोसा’मुळे ८३९ विवाहिता पुन्हा नांदायला सासरी

जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या काळात सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलमुळे ८३९ महिला वाद विसरून पुन्हा सासरी नांदायला गेल्या आहेत.दरम्यान, चौदा महिन्यात कौटुंबिक छळाला कंटाळलेल्या दीड हजारांवर विवाहितांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
Family harassment
Family harassmentsakal

सोलापूर : विवाहापूर्वी सातजन्म एकमेकांना साथ देण्याची शपथ घेणारे, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणणाऱ्या तब्बल दीड हजार महिलांनी ‘तुझ्या पायात काटा रूतला तर वेदना मला होतील’, अशा आणाभाका घेतलेल्या पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या काळात सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलमुळे ८३९ महिला वाद विसरून पुन्हा सासरी नांदायला गेल्या आहेत. त्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत.दरम्यान,चौदा महिन्यात कौटुंबिक छळाला कंटाळलेल्या दीड हजारांवर विवाहितांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

माहेरी लाडात वाढलेल्या मुलीला चांगले सासर मिळावे, तिचा संसार आपल्या डोळ्यादेखत सुखाचा व्हावा, असे स्वप्न पाहून तिचे आई-वडील जावई शोधतात. परंतु, कोरोनामुळे अनेकांच्या संसारात वितुष्ट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक तरुणांचा जॉब गेला, आता तो काहीच कामधंदा करीत नाही. काहींना दारूचे व्यसन लागले तर काहींच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यातूनच पती-पत्नीच्या सुखी संसारात वाद होत आहेत.

तसेच काही पती-पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करतात, अशीही वस्तुस्थिती आहे. पत्नी सतत मोबाईलवरच बोलत असते, विवाहावेळी मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, वंशाला दिवा (मुलगा) नाही अशा अनेक कारणांमुळे सासरच्यांकडून ‘ती’चा छळ होतोय. अनेक वर्षे त्रास सहन करूनही सासरच्यांचा छळ कमी होत नाही, मग काही महिला पोलिसांत धाव घेतात, अशीही उदाहरणे आहेत. अशा महिलांचे समुपदेशन पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलकडून केले जात आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तक्रार केलेल्या महिलांपैकी ६० टक्के महिला वाद विसरून पुन्हा सासरी परतल्या आहेत.

हुंड्यासाठी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

पती जत येथील हायस्कूलमध्ये लिपिक असून त्याच्या सहा हजार रुपयाच्या पगारात घरखर्च भागत नाही. कार घ्यायला माहेरून एक लाख रुपये आण म्हणून पतीसह सासरच्यांनी छळ केला. विवाहात हुंडा कमी दिला, मानपान केला नाही म्हणूनही सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी फिर्याद अनिता शंकर कुंभार (रा. हत्तुरे वस्ती, होटगी रोड विमानतळ) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. त्यानुसार पती शंकर धुंडप्पा कुंभार, दीर उमेश कुंभार, जाऊ गीता कुंभार, सदाशिव कुंभार, उमेश परसप्पा कुंभार, भागव्या सदाशिव कुंभार, संतोष कुंभार, निंगप्पा कुंभार (सर्वजण रा. निडाणी, विजयपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळसूत्र विकूनही पतीकडून पत्नीचा छळ

बेडरपूल येथील विलास तलाठे याचा सामुदायिक विवाह सोहळ्यात सन २०२१ मध्ये श्वेता हिच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्याने पत्नीचे मंगळसूत्र, मोबाईल विकला. तरीसुद्धा विवाहात तुझ्या माहेरच्यांनी मानपान केला नाही, कर्ज फेडायला माहेरून दोन लाख रुपये आण म्हणून त्याने पत्नी श्वेताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. तिच्या आईला देखील शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर घरातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले आणि श्वेताला घरातून हाकलून दिले. पतीच्या त्रासाला कंटाळून श्वेताने सदर बझार पोलिस ठाणे गाठले. विलास राजू तलाठेविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वाद नको, समजुतदारपणा हवा

उच्चशिक्षित मुलींना काम नको वाटते, सासू-सासरे नको वाटतात. पती देखील काही कामधंदा करीत नाही. त्याला दारूचे व्यसन आहे, चारित्र्यावर संशय घेऊन किंवा माहेरून पैसे आण म्हणून पत्नीचा छळ करतो. अशावेळी दोघांचा संसार शुल्लक कारणांमुळे तुटू नये म्हणून ‘भरोसा’ सेलकडून समुपदेशन केले जाते. त्यातून १५ महिन्यांतील ३९५ पैकी २७९ महिला पुन्हा नांदायला गेल्या आहेत.

- प्रियंवदा जाधव, पोलिस उपनिरीक्षक, (भरोसा सेल) ग्रामीण पोलिस, सोलापूर

कौटुंबिक वादाची प्रमुख कारणे...

  • - उच्चशिक्षित काही तरूणांनी पती-पत्नीच्या संसारात सासू-सासरे नको वाटतात.

  • - पती कामधंदा करीत नाही, त्याला दारूचे व्यसन असून तो सतत छळ करतो.

  • - कर्जबाजारी सासरचे लोक माहेरून पैसे आण म्हणून सतत त्रास देतात.

  • - पत्नी सतत मोबाईलवर असते, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्यांकडून छळ.

  • - विवाहात मानपान नाही, महागड्या वस्तू दिल्या नाहीत, हुंडा दिला नाही म्हणून त्रास देणे.

  • - नीट स्वंयपाक येत नाही, मुलीच झाल्या, वंशाला दिवा दिला नाही छळ करणे.

  • - माहेरच्या लोकांची मुलीच्या संसारात लुडबूड; मुलींना खेड्यात राहायला नको वाटते.

१५ महिन्यातील कौटुंबिक छळ प्रकरणांची आकडेवारी

  • शहर पोलिसातील तक्रारी

  • ११३१

  • सासरी नांदायला गेलेल्या मुली

  • ५६०

  • ग्रामीण पोलिसांकडील तक्रारी

  • ३९५

  • सासरी गेलेल्या विवाहिता

  • २५९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com