
सोलापूर: सोमवारी सायंकाळी संततधार सुरू असतानाही शहराच्या विविध भागातील तब्बल २२ ज्येष्ठ नागरिक संघटनांचे ४४ पदाधिकारी एका अनामिक ओढीने आपापल्या घरातून बाहेर पडले. अगदी वेळेवर ‘सकाळ’ कार्यालयात पोहोचले. कुणी शेळगी, बाळे तर कुणी नवी पेठ, होटगी रोड, जुळे सोलापूर भागातून आलेले. सर्वांनी एकमुखी निर्धार केला - ‘डीजेमुक्त सोलापूर! बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी १० वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे एकत्र यायचे आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचा. डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे.’ डीजे राक्षस आहे आणि या राक्षसाला गाडायचाच, अशा शब्दांत भर पावसात एकत्र आलेल्या या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.