रिक्षातून 28 तोळे सोने चोरीला! मावस बहिणीच्या साखरपुड्याला गेल्यावर 28 तोळ्याची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold
रिक्षातून 28 तोळे सोने चोरीला! मावस बहिणीच्या साखरपुड्याला गेल्यावर 28 तोळ्याची घरफोडी

रिक्षातून 28 तोळे सोने चोरीला! मावस बहिणीच्या साखरपुड्याला गेल्यावर 28 तोळ्याची घरफोडी

सोलापूर : येथील बस स्टॅण्डवरून रिक्षातून जुळे सोलापुरातील वामन नगराकडे येणाऱ्या 60 वर्षीय महिलेच्या बॅगेतील तब्बल साडेअकरा लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी अलका भगवानराव जोशी (रा. निर्मिती समृध्दी अपार्टमेंट, वामन नगर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुसरीकडे पुण्यातील मावस बहिणीच्या साखरपुड्याला गेल्याने घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथील अफसर मोहम्मद शफी खान यांचे घर फोडले. त्यांच्या शेजारीलही औरंगाबादला गेले होते. चोरट्याने खान यांच्या घरातून तब्बल साडेआठ लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. खान यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची हकीकत अशी, सोमवारी (ता. 28) अलका जोशी व त्यांचे पती आणि नातू हे तिघे सकाळी साडेदहा वाजता उस्मानाबादहून सोलापूर एसटी स्टॅण्डवर उतरले. तेथून घराकडे जाण्यासाठी ते बस स्टॅण्डजवळील रिक्षात बसले. जुळे सोलापुरातील घराकडे जात असतानाच काही अंतरावर रिक्षा गेल्यानंतर तीन अनोळखी महिला रिक्षात बसल्या. रिक्षात पूर्वीचेच तिघे असल्याने एक महिला चालकाजवळ बसली तर दोघी मागे बसल्या. गर्दी होत असल्याने त्यांची चुळबूळ सुरू झाली. रिक्षा सात रस्ता परिसरात आल्यानंतर त्या तिघीही तेथे उतरल्या आणि निघून गेल्या. घरी गेल्यानंतर अलका जोशी यांनी त्यांच्या कपड्याच्या बॅगेतील पर्स पाहिली, परंतु पर्स चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. 1) पोलिस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला. त्यानुसार आता सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर हे त्या महिलांचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली जात आहे.

रिक्षातून चोरीचा नवीनच फंडा...
रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला अथवा वयस्क व्यक्‍तीजवळील बॅगेत काहीतरी मौल्यवान असल्याचा अंदाज घेऊन काही महिला वाटेतच रिक्षा थांबवून त्यात बसतात. दोघे-तिघी असल्याने रिक्षाचालक एकीला त्याच्या सीटवर बसवतो तर दोघी मागील सीटवर बसतात. एकीजवळ लहान मूल असते तर दुसरीकडे स्वत:ची बॅग असते. गर्दीमुळे ती अनोळखी महिला रिक्षातील प्रवाशाच्या बॅगवर स्वत:ची बॅग ठेवते. त्याचवेळी दुसरी महिला बाळाकडे लक्ष विचलित करते. कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून एक महिला प्रवाशाच्या बॅगेतील दागिने, रोकड लंपास करतात आणि वाटेतच उतरतात, असा हा चोरीचा फंडा या घटनेनंतर समोर आला आहे.

घरी कोणीच नसल्याची साधली संधी
पुण्यातील मावस बहिणीच्या साखरपुड्याला गेल्याने घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथील अफसर मोहम्मद शफी खान यांचे घर फोडले. त्यांच्या शेजारीलही औरंगाबादला गेले होते. चोरट्याने खान यांच्या घरातून तब्बल साडेआठ लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. खान यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. बंद घरांवर चोरटे वॉच ठेवून त्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून तेथे चोरी करू लागले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांची रात्रीची गस्त असतानाही चोरटे पोलिसांना वरचढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अफसर खान हे त्यांच्या मावस बहिणीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुण्याला गेले होते. फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता खान यांचे कुटुंबिय घर बंद करून पुण्याला रवाना झाले होते. त्यांच्या शेजारी राहणारेही परगावी गेल्याने त्याठिकाणी कोणीही नसल्याची संधी चोरट्याने साधली. चोरट्याने घराचा कडी, कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तोळ्यांचे दोन नेकलेस, आठ तोळ्यांच्या बांगड्या, अडीच तोळ्याच्या अंगठ्या, एक तोळ्याची सौन्याची चैन व एक तोळ्याचे कानातील झुमके, असा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास पोलिस निरीक्षक बोंदर हे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.