शहरात नव्याने ६४ रिक्षा थांबे प्रस्तावित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

64 new rickshaw stops proposed in Solapur city

शहरात नव्याने ६४ रिक्षा थांबे प्रस्तावित

सोलापूर - प्रवाशांना तत्काळ रिक्षा उपलब्ध व्हावी म्हणून शहरातील चौकांत तसेच नाक्यांवर रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत; मात्र या थांब्यांवरील काही चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. या पार्श्र्वभूमीवर सोलापूर शहर वाहतूक शाखा, आरटीओ आणि महापालिका प्रशासनाने शहरात नव्याने सर्वेक्षण करून त्याआधारे नवीन ६४ रिक्षा थांबे उभारण्याचे नियोजन सुरू केले आहे.

‘साडेसोळा हजार रिक्षांसाठी अवघे २३९ थांबे’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. १) बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार सोलापूर शहर वाहतूक शाखा, आरटीओ व महापालिका प्रशासनाने शहरात नवीन ६४ रिक्षा थांब्यांच्या सर्वेक्षणास सुरवात केली आहे. नव्या थांब्यांवर रिक्षा एका रांगेत उभ्या राहाव्यात आणि उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला राहावा, यासाठी थांब्यांजवळ लोखंडी रेलिंग टाकण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला असून, त्यातून सोलापूरकरांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा गेल्या काही दिवसांपासून सविस्तर अभ्यास सुरू केला असून, त्यामध्ये शहरात वाहतूक कोंडी होण्यामागची कारणे शोधण्यात येत आहेत.

या अभ्यासादरम्यान शहरातील चौका तसेच नाक्यांवर असलेल्या रिक्षा थांब्यांवर एका रांगेत वाहने उभी केली जात नसल्याने या भागातील वाहतुकीस अडथळा होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शहरात नव्याने सर्वेक्षण करून त्याआधारे रिक्षा थांबे उभारण्याचे नियोजन सुरू आहे.

रिक्षाचालकांना एकच रांग लावण्याचे निर्देश

शहरातील रिक्षा थांब्यांवर व परिसरात आणि गॅसच्या पंपावर सीएनजी भरण्यासाठी कार आणि रिक्षांसाठी रांगा लागतात. या रांगा रस्त्यावर लागत असल्यामुळे वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहात नाही. त्यामुळे पंपचालकांना एकच रांग करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. पंपावर गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी पंपचालकांची आहे. त्यामुळे त्यांनी याचे नियोजन करावे. त्याचबरोबर शहरातील वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून पंपचालकांना अशा प्रकारच्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने वाहनांना शिस्त लावली जात आहे. त्याचबरोबर शहरात मागील दीड-दोन वर्षाच्या काळात रिक्षांची संख्या वाढली असून, आरटीओ, महापालिका आणि वाहतूक शाखेकडून ६४ नवीन रिक्षा थांब्यांचे नियोजन सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल.

- अजय परमार, सहाय्यक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक.

Web Title: 64 New Rickshaw Stops Proposed In Solapur City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..