जिल्ह्यात दरमहा वाढताहेत ६५०० वाहने! कोरोनानंतर वाढली विक्री; प्रत्येक दोन व्यक्तींमागे एक वाहन

कुटुंबीयांसमवेत कोठेही सोयीने प्रवास करता येईल, या हेतूने स्वतः:च्या मालकीचीच वाहने खरेदीकडे कल वाढला आहे. त्यातूनच जिल्ह्यात दरमहा सहा हजार वाहने वाढत असून त्यात दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा व मालवाहतूक वाहनांची संख्या अधिक असल्याची बाब समोर आली आहे.
solapur jilha
solapur jilhasakal

सोलापूर : शहरातील महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आली आहे. दुसरीकडे कोरोना काळात तब्बल एक वर्षभर प्रवासी वाहतूक (एसटी, रेल्वे, ट्रॅव्हल्स वगैरे) बंदच राहिली. या पार्श्वभूमीवर पुढील काळात कुटुंबीयांसमवेत कोठेही सोयीने प्रवास करता येईल, या हेतूने स्वतः:च्या मालकीचीच वाहने खरेदीकडे कल वाढला आहे. त्यातूनच जिल्ह्यात दरमहा सहा हजार वाहने वाढत असून त्यात दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा व मालवाहतूक वाहनांची संख्या अधिक असल्याची बाब समोर आली आहे.

दुचाकी, स्कूटर, मोपेड (तीनचाकी मोटारसायकल), मोटार कार, जीप, टॅक्सी, ऑटोरिक्षा, मिनी बस, स्कूल बस, खासगी सेवा देणारी वाहने, रुग्णवाहिका, ट्रॅक, टॅंकर, तीन-चारचाकी मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलांचे दूरवरील कॉलेजमधील शिक्षण, नोकरीसाठी ये-जा करणे, कामाच्या ठिकाणी तत्काळ पोचण्याची घाई, शेतमालाची वाहतूक करणे, तातडीने शेतीची मशागत करणे, रुग्णसेवा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

जिल्ह्यातील अनेकजण पुणे-मुंबईला नोकरी तथा शिक्षणाच्या निमित्ताने ये-जा करतात. शेतमाल विक्रीसाठी अनेकजण शहरातील बाजार समित्यांमध्ये येतात. ग्रामीण भागातील अनेक मुले शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. शहरात सध्या १६ हजारांवर रिक्षा असून ग्रामीणमध्येही त्याची संख्या सहा हजारांपर्यंत आहे. खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करण्याऐवजी अनेकांनी स्वतः:च्या सोयीसाठी मालकीचीच वाहने घेतली आहेत. छोट्या-मोठ्या कामांसाठी वाहनांचा वापर केला जातो, अशी स्थिती आहे.

सर्वाधिक असलेली वाहने

  • दुचाकी : ११,१५,२४८

  • मोपेड (तीन चाकी मोटारसायकल) : ७५,०८२

  • मोटार कार : १,५९,३०९

  • रिक्षा : १६,४४७

  • ट्रॅक : १७,२९०

  • मालवाहतूक वाहने : २४,७००

  • ट्रॅक्टर : ४४,०६७

लर्निंग परवाना ऑनलाइन सहजपणे मिळतोय

शासनाच्या ‘सारथी’ संकेतस्थळावरील परिवहन विभागाच्या सेवांमध्ये जाऊन नवीन चालकांना घरबसल्या ऑनलाइन लर्निंग परवाना मिळू लागला आहे. ही सुविधा फेसलेस असल्याने कोणीही कोणाचा परवाना काढू शकतो. त्यामुळे दुचाकी खरेदी प्रचंड प्रमाणात वाढली असून सोलापूर आरटीओ कार्यालयाकडे दरमहा सव्वातीन हजार दुचाकी तर अकलूज आरटीओ कार्यालयाकडे अडीच हजार दुचाकींची नोंदणी होत आहे. शहरातील रिक्षांची संख्या १६ हजारांवर असतानाही अजून दरमहा ४५ रिक्षा वाढत आहेत.

प्रत्येक दोन व्यक्तींमागे एक वाहन

जिल्ह्यात १८ वर्षांवरील लोकसंख्या ३५ लाख ८९ हजारांपर्यंत आहे. त्यात १८ ते ५९ वयोगटातील लोकसंख्या ३० लाखांपर्यंत असून १८ वर्षांवरील व्यक्तीलाच वाहन चालवायचा परवाना मिळतो. जिल्ह्यात सध्या एकूण वाहनांची संख्या १८ लाख ३० हजारांवर आहे. प्रत्येक दोन व्यक्तींमागे एक वाहन, अशी सद्यःस्थिती आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६५० अपघाती मृत्यू

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी अकराशे रस्ते अपघात होतात. त्यात सरासरी ६५० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतोय. २०२१ मध्ये जिल्ह्यात एक हजार १०१ अपघातात ६१६ जणांचा मृत्यू झाला असून २०२२ या वर्षात एक हजार २५० अपघातात ७०२ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दोन वर्षांत साडेबाराशे व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर शहरात दोन वर्षांत साडेतीनशे अपघातात १५३ जणांचा मृत्यू झाला असून पावणेदोनशे जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com