esakal | सोलापूरमधून 955 ऊसतोड मजूर जाणार मुळगावी 
sakal

बोलून बातमी शोधा

worker

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या साखर कारखान्यांमध्ये लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या ऊसतोड कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था सोलापूर जिल्हा प्रशासन व संबंधित साखर कारखान्याच्यावतीने करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून या ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर त्यांच्या मूळगावी पाठविण्याची कार्यवाही केली जाईल. 
- शैलेश सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर. 

सोलापूरमधून 955 ऊसतोड मजूर जाणार मुळगावी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळपास 955 ऊसतोड कामगार सोलापूर जिल्ह्यात अडकले आहेत. राज्यात 38 साखर कारखान्यांमध्ये एक लाख 31 हजार पाचशे ऊस तोडणी कामगार अडकले होते. या कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मार्गदर्शक सूचना दिल्याने या कामगारांचा त्यांच्या मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हेही वाचा - सोलापुरात आता गल्लोगल्ली "धुलाई' 

माढा तालुक्‍यातील कै. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर 250, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर येथे 13, करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे दहा ऊसतोड कामगार सध्या दक्षिण सोलापूर हद्दीत आहेत. सोलापूर जिल्ह्या शेजारी असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील साखर कारखान्यातील 682 ऊसतोड मजूर हे माळशिरस तालुक्‍यातील 13 गावांमध्ये वास्तव्यास आहेत. माळशिरस तालुक्‍यातील रेडे, गोरडवाडी, इस्लामपूर या भागात आटपाडी येतील साखर कारखान्याचे व श्री श्री श्री सद्‌गुरू शुगर कारखान्याचे हे मजूर आहेत. बीड, यवतमाळ, चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यातील हे ऊसतोड कामगार असून संबंधित साखर कारखान्याच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्यावतीने या कामगारांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा - अक्कलकोट तालुक्‍यात बिबट्याचा धुमाकुळ? 

खरिपाचा आगामी हंगाम, शेतीविषयक इतर कामांसाठी आम्हाला आमच्या मूळ गावी जाऊ द्या अशी मागणी सातत्याने या ऊसतोड कामगारांच्यावतीने साखर कारखान्यांकडे होत होती. साखर कारखान्यांनी ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्य सचिवांना कळविली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हे मजूर ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली जाणार आहे. कामगार व त्यांचे कुटुंबीय मूळ गावी पोहोचल्यानंतर या कामगारांचा गाव प्रवेशाची ही जबाबदारी त्या गावातील सरपंचावर सोपविण्यात आली आहे. या निर्णयानुसार राज्यातील किती कारखान्यांमधील किती ऊसतोड मजूर त्यांच्या मूळ गावी परत गेले आहेत त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. 

अशी घ्यावी लागणार दक्षता 
साखर कारखाना परिसरात 14 दिवसांपेक्षा जास्त वास्तव्य झाले आहे अशा कामगारांना संबंधित साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक हे प्रमाणित करणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या सर्व कामगारांची व कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निमोनिया व तत्सम कोणतीही लक्षणे नाहीत सर्दी ताप खोकला ही लक्षणे आढळून येत नाहीत अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. मजुरांचे निवासी पत्ते, संपर्क क्रमांक, त्या गावातील सरपंच यांची ही माहिती साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक संकलित करणार आहेत. ऊसतोड मजूर ज्या जिल्ह्यात सध्या वास्तव्यास आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सर्व माहिती व आराखडा मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. मजूर ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या आराखड्याची व माहितीची एक प्रत दिली जाणार आहे.

loading image